खलितेबाजी करण्यापेक्षा तत्काळ कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नागपूर - काश्‍मीरमधील उरी शहरात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सैन्याचे 18 जवान शहीद झालेत. आता भारताने पाकिस्तानशी खलितेबाजी करण्यापेक्षा खंबीर भूमिका घेत तत्काळ कारवाई करावी, असे मत कर्नल सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. 

 

नागपूर - काश्‍मीरमधील उरी शहरात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सैन्याचे 18 जवान शहीद झालेत. आता भारताने पाकिस्तानशी खलितेबाजी करण्यापेक्षा खंबीर भूमिका घेत तत्काळ कारवाई करावी, असे मत कर्नल सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. 

 

कर्नल देशपांडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत पाकिस्तान असो वा चीन यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक युद्धात सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत, विजय मिळविला. तीनदा पाकव्याप्त काश्‍मीर आणि एकदा लाहोरपर्यंत सैनिक गेलेत. त्याचवेळी हा प्रश्‍न मिटविता आला असता. मात्र, प्रत्येकवेळी राजकीय मानसिकतेमुळे त्यांनी केलेल्या पराक्रमावर पाणी फेरण्यात आले. अगदी "आयसी 814‘ विमानाच्या अपहरणात सध्याच्या हल्ल्यातील "मास्टरमाइंड‘ असलेल्या हाफिज सईदला सोडण्याचा निर्णय राजकारण्यांनी घेतला. या प्रकारामुळे सैनिकांच्या मानसिकतेचे खच्चीकरण केले जात आहे. शिवाय इतर देशांच्या मनात भारतीय दुर्बल असल्याची प्रतिमा निर्माण होत आहे. उरी येथे सैनिकांवर झालेला हल्ला हा निंदनीयच आहे. सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करावीच. मात्र, मेणबत्त्या आणि केवळ श्रद्धांजली अर्पण करून होणार नाही. आता भारताने याविरुद्ध ताठर भूमिका घेण्याची गरज आहे. भारतीय सेना जगामध्ये क्रमांक एकवर आहे. त्याचा फायदा घेण्याची गरज आहे. किमान पाकव्याप्त काश्‍मिरात असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करून ते उद्‌ध्वस्त करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपातून काहीही निघणार नसल्याने भारताने पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करून धडा स्वत:च शिकवावा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया 

पाकिस्तान विरोधात तत्काळ कारवाईची गरज असून, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी आदेश द्यावेत. 

- प्रेषित कांबळे, विद्यार्थी.

आपण असे हल्ले कुठपर्यंत सहन करणार? आता चोख प्रत्युत्तराची वेळ आहे. 

- नीरज लेंडे, विद्यार्थी. 

आपला देश कुणाची वाट बघतोय? हातात दगड असल्यास दगड, बंदूक असेल तर गोळा आणि बॉम्ब असल्यास ते टाकून पाकिस्तानला धडा शिकवा. 

- लव जिंदाल, विद्यार्थी.