"हिट ऍक्‍शन प्लान'ची अंमलबजावणी शनिवारपासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - शहरात "हिट ऍक्‍शन प्लान'ची (उष्माघात कृती आराखडा) अंमलबजावणी येत्या शनिवारपासून करण्याचा निर्णय महापालिकेत आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अंमलबजावणी करताना वाटसरू, कामगारांसाठी 173 उद्याने दिवसभर खुले करण्यात येणार असून, पाणपोईंच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. 

नागपूर - शहरात "हिट ऍक्‍शन प्लान'ची (उष्माघात कृती आराखडा) अंमलबजावणी येत्या शनिवारपासून करण्याचा निर्णय महापालिकेत आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अंमलबजावणी करताना वाटसरू, कामगारांसाठी 173 उद्याने दिवसभर खुले करण्यात येणार असून, पाणपोईंच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. 

"सकाळ'ने "हिट ऍक्‍शन प्लान'चा बोजवारा उडाला या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित करताना महापालिका यंत्रणेला जाग आली. हिट ऍक्‍शन प्लानचे समन्वयक डॉ. नंदकिशोर राठी, आरोग्य अधिकारी (एम) डॉ. अनिल चिव्हाणे, साथरोग अधिकारी डॉ. सुनील घुरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी बैठक घेतली. या बैठकीत इमारत बांधकाम कंत्राटदार असोसिएशनचे पदाधिकारीही होते. इमारत बांधकाम कंत्राटदारांना मजुरांकडून दुपारच्या वेळी कामे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मजुरांकडून सकाळी लवकर तसेच सायंकाळी कामे करून घेण्याचेही सूचित करण्यात आले. शहरातील दहाही झोनमधील झोनल आरोग्य अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये झोनल अधिकारी जनजागृती करणार असून, बाजारांमध्ये भाजीविक्रेत्यांना तंबूचा कापड जाड वापरण्याचा सल्ला देणार आहे. 43 अंशांपेक्षा जास्त तापमान झाल्यास अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला एसएमएसद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. 

परीक्षा सकाळी घ्या शिक्षण विभागाला पत्र 
विद्यार्थ्यांच्या परीक्षा दुपारी भर उन्हात घेण्याऐवजी सकाळी घेण्यात याव्या, अशा सूचना महापालिकेने शिक्षण विभागाला केल्या आहेत. परंतु, अनेक शाळांचे परीक्षेचे वेळापत्रक तयार झाल्याने त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. 

वाहतूक पोलिसांसाठी "ग्रीन नेट' 
शहरातील प्रत्येक चौकांमध्ये भर उन्हात वाहतूक पोलिसांना उभे राहून वाहतुकीचे संचालन करावे लागते. उन्हापासून बचावासाठी वाहतूक पोलिसांना "ग्रीन नेट' उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना महापालिकेने वाहतूक विभागाला दिल्या आहेत. 

पाणपोईंची संख्या वाढविणार 
मागील वर्षी महापालिकेने 373 पाणपोई केंद्रे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभी केली होती. यावर्षीही महापालिका सामाजिक संस्थांना आवाहन करणार असून यात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण 
अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मागील वर्षी 24 हजार 869 विद्यार्थी, 1 हजार 25 शिक्षक व 730 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले. 

हवामान खात्यालाही आली जाग 
हवामान विभागाने सोमवारी एसएमएसद्वारे सोमवार (आज) व उद्या, मंगळवारी 40 अंश सेल्सिअसवर तापमान राहणार असल्याची माहिती दिल्याचे मनपातील अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.