महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे आरोग्य सुधारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नागपूर - शहरातील महापालिकेची आरोग्य सुविधा ढासळली आहे. रुग्णालयात जागोजागी अस्वच्छता आहे. इमारती जीर्ण झाल्या असून, रुग्णालयांमध्ये डॉक्‍टर, औषधी नसते. खाटांची संख्या अपुरी आहे. हे वास्तव "दै. सकाळ'च्या स्टिंगमधून पुढे आल्यानंतर मनपाची रुग्णालये व हेल्थपोस्टमध्ये आरोग्यदायी उपचार मिळतील अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी करण्यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांची आज भेट घेतली. रुग्णालयाचा पाहणी दौरा करावा, असे पत्रही त्यांनी आयुक्‍तांना दिले.

"सकाळ'ने महापालिकेच्या रुग्णालयातील वास्तव स्टिंगद्वारे उघड केले. या वृत्तमालिकेची दखल घेत सामाजिक संघटनांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आयुक्तांना याबाबत जाब विचारणे सुरू केले. आयुक्तांपुढे निवेदनाचा पाऊस पडत असून, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनीही "सकाळ'च्या वृत्ताचा उल्लेख करीत आयुक्तांना पत्र दिले. शहरातील सामान्य व गरीब जनतेला महापालिकेच्या आरोग्यसेवेकडूनच अपेक्षा आहे. परंतु, आरोग्यविषयक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. डॉक्‍टर, कर्मचारीही उपस्थित राहात नसल्याचे महाकाळकर यांनी पत्रात नमूद केले. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून, बऱ्याच वर्षांपासून रंगरंगोटी नसल्याने रुग्णालय की कोंडवाडा, असा प्रश्‍न पडतो. अशा स्थितीत रुग्णांच्या संख्येत वाढ कशी होईल? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे मनपाच्या केंद्रीय कार्यालयात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कक्षावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना रुग्णालयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नमूद करीत त्यांनी रुग्णालये सुविधांनी युक्‍त असावी, अशी मागणी केली.

महापालिका रुग्णालयात प्रामुख्याने गरीब लोक उपचारासाठी येतात. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्तांनी शहरातील महापालिका रुग्णालयांत निरीक्षण दौरा करावा. यासाठी विशेष रुग्णालय सुधारण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलावी.
- संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेता, महापालिका, नागपूर.