अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एबी फॉर्मवाटपच्या दिवशी अभिजित वंजारी यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती; तसेच त्यांना धक्काबुक्की केली. पूर्व नागपूरमधील आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्याचा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा नेत्यांवर आरोप आहे.

नागपूर - येथील हसनबाग परिसरातील प्रचार सभेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर ललित बघेल या कार्यकर्त्याने शाई फेकल्याने कॉंग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर आला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणाऱ्याला बेदम चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी, या प्रकारात भाजप-संघाचा हात असल्याचा आरोप केला आणि शाई फेकणारा कॉंग्रेसचा कार्यकर्ता असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

आज शहरातील संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसनबाग परिसरात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची सभा आयोजित केली होती. सभेत माजी मंत्री नसीम खान यांचे भाषण झाले. यादरम्यान अशोक चव्हाण व्यासपीठावर आले असता कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरवात केली. यातच एक कार्यकर्ता व्यासपीठावर आला आणि "चव्हाण मुर्दाबाद' अशी जोरात घोषणा देत त्यांच्या अंगावर शाई फेकली. शाईमुळे चव्हाण यांचे कपडे खराब झाले. याचवेळी काही जणांनी त्यांच्या दिशेने अंडेही फेकले. निळ्या शाईमुळे खराब झालेले कपडे बदलून चव्हाण व्यासपीठावर पुन्हा आले. या वेळी व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, माजी खासदार विलास मुत्तेमवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.

उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एबी फॉर्मवाटपच्या दिवशी अभिजित वंजारी यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती; तसेच त्यांना धक्काबुक्की केली. पूर्व नागपूरमधील आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्याचा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा नेत्यांवर आरोप आहे. त्यांच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या समर्थकांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा पुतळे जाळून निषेध नोंदवला.

Web Title: ink thrown on congress leader ashok chavan in nagpur