आयटी कंपन्यांचा भार आउटसोर्सिंगच्या खांद्यावर

apeksha-it
apeksha-it

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात एका ‘क्‍लिक’वर मिळू शकते. प्रत्यक्षात मात्र ‘इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी’ हे क्षेत्र केवळ इंटरनेटपुरते मर्यादित नाही. माहितीसोबतच आपल्या जीवनपद्धतीतही आमूलाग्र बदल घडविण्यात ‘आयटी’चे मोठे योगदान आहे. आज या क्षेत्रात मोठ्या बदलाची आवश्‍यकता आहे आणि तेच मोठे आव्हान आहे. कारण तंत्रज्ञानात नवा बदल झाला तरी तो काही दिवसांमध्येच कालबाह्य ठरतो. ‘अनस्किल्ड’ मनुष्यबळ आणि  या क्षेत्रात सातत्याने येणारी मंदीचा मोठा अडथळा आहे. हार्डवेअरमध्ये क्रांती झाल्याशिवाय सॉफ्टवेअरला चांगले दिवस येणे शक्‍य नाही. त्यामुळे ‘आयटी’ला बूस्ट मिळण्यासाठी हीच सर्वाधिक महत्त्वाची बाब ठरू शकते.

माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आल्याचे बोलले जाते. मोबाईल, इंटरनेट आणि इतर दृकश्राव्य माध्यमांमुळे ते सहज शक्‍य झाले आहे. या क्षेत्रात गती असेल तरच आज स्पर्धेच्या युगात  मोकळा श्‍वास घेऊ शकतो. संगणकाने माहिती तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरविले आहे असे प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळते. शासकीय कामकाजदेखील माहिती तंत्रज्ञानांवर आधारित  आहे. शासन स्तरावरील सर्व सेवांचा लाभ जनतेला अतिशय चांगल्या प्रकारे देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आधार कार्ड, सेतू-सुविधा केंद्रे, ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत, ग्राम सेवा केंद्र यासारखे माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली. रोजच्या जीवनातील कामे अगदी सहज व सोप्या पद्धतीने करण्यास माहिती तंत्रज्ञान मदत करते. केवळ प्रशासनच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना संपूर्ण अध्यापन संगणकाच्या व इंटरनेटच्या मदतीने अगदी सहज  व प्रभावी स्वरूपात करता येते. तोही ‘डिजिटल’ शिक्षणाचा भाग ठरतो. विद्यार्थ्यांनीही अशा डिजिटल शिक्षणाचा पुरेपूर फायदा करून घेण्याची गरज आहे. 

गेल्या काही वर्षांत देशातील काही शहरे ‘आयटी हब’ म्हणून नावारूपास आली. मात्र, या कंपन्या ‘आउटसोर्सिंग’वर चालत असून केवळ सॉफ्टवेअरच त्या तयार करीत असल्याचे दिसते. ‘हार्डवेअर’ विकसित करण्यात आपण बरेच मागे आहोत. अशावेळी या क्षेत्रातील कंपन्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने मोठ्या कंपन्यांना भारतात आणण्याची नितांत आवश्‍यकता आहे. ज्यातून ‘आयटी’ क्षेत्राला ‘बूस्ट’ मिळेल. मंदीच्या गर्तेत असलेल्या कंपन्यांना दिलासा देण्यासाठी असे प्रकल्पही देशाअंतर्गत सुरू करण्याची गरज आहे. ‘स्किल्ड मॅनपॉवर’ ही सर्वांत मोठी बाब आहे. आजही आयटी कंपन्यांमध्ये २० टक्के मनुष्यबळ ‘अनस्किल्ड’ आहे. त्यांना कंपन्यांकडून प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, हे प्रशिक्षण अभ्यासक्रमातूनच मिळाल्यास कंपनीचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. शिवाय प्रत्येक महिन्याला बदलणारे तंत्रज्ञान कसे आत्मसात करता येईल, याचा समावेश अभ्यासक्रमात करणे नितांत  गरजेचे आहे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करावा लागेल. सध्याच्या माहिती युगात शैक्षणिक ध्येय समजून घेण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या नवनवीन स्वरूपांचा शिक्षणात अंतर्भाव करणे गरजेचे आहे. 

स्कोप आयटीचा
मल्टिचॅनेल लर्निंग (बहुवाहिनी शिक्षण), दूरदर्शन, रेडिओ, वेब-आधारित सूचना, शोधासाठी ग्रंथालये, विज्ञान व तंत्रज्ञान यांची प्रात्यक्षिके, माध्यमांचा (मीडिया) वापर, विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचा वापर, लहान मुलांचा विकास, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, मनुष्यबळ विकास, शिक्षकांच्या तयारीसाठी व प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर, धोरणे आखण्यासाठी, माहिती व्यवस्थापन (डेटा प्रबंधन) करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, शाळा व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, सूचनात्मक साधने, ऑडियो, व्हिडिओ व डिजिटल उपकरणे (श्राव्य, दृश्‍य व डिजिटल उत्पादने), सॉफ्टवेअर व कंटेन्टवेअर, संपर्काची साधने, शैक्षणिक संकेतस्थळे.  

सरकारकडून अपेक्षा 
आयटी क्षेत्रात वर्षभरापासून मंदीचे सावट आहे. त्यामुळे कंपनीच्या उलाढालीमध्ये घट होत आहे. ही घट थांबविण्यासाठी शासनाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यासाठी विदेशातील मोठ्या प्रकल्पांना भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून होण्याची गरज आहे. शिवाय ‘सॉफ्टवेअर’प्रमाणेच ‘हार्डवेअर’ निर्मितीसाठी सरकारने पाऊल उचलणे अपेक्षित आहे. याशिवाय ‘स्किल बेस्ड’ मनुष्यबळाची अधिकाधिक निर्मिती करण्यासाठी अभियान राबविण्याची गरज आहे. शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करून उद्योगानुरूप शिक्षणावर भर द्यावा लागेल. 

तज्ज्ञ म्हणतात
आयटी क्षेत्रात तीन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने होतो. यामध्ये मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग आणि ब्लॉक चेन यांचा समावेश आहे. या तिन्ही तंत्रज्ञानातून आयटीचा विकास होतो. आज सर्व कामे ऑनलाइन होत आहेत. अत्याधुनिकतेच्या दिशेने सुरू असलेली ही प्रगती एका दिवसात साध्य करता आली असे म्हणता येणार नाही. त्यात आयटी क्षेत्राचा मोठा वाटा आहे.  मात्र, या क्षेत्रातही बऱ्याच बदलांची गरज आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून प्रयत्न अपेक्षित आहे. समाजानेही तेवढेच जागृत होण्याची गरज आहे. 
- अमित तोडकर, चीफ टेक्‍निकल आर्किटेक्‍ट, पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड

आयटी क्षेत्रात काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज सगळ्यात मोठी समस्या आहे ती मंदीच्या सावटाची. त्यातून बाहेर पडण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे. त्यातून बाहेर पडत या क्षेत्राला ‘बूस्ट अप’ देण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखण्याची गरज आहे. शिवाय ‘हार्डवेअर’ निर्मितीसाठी सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याच्याशी निगडित प्रकल्प  देशात आणावे लागतील. ‘स्किल बेस्ड’ मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मंत्रालयाकडून विशेष प्रयत्नांची गरज आहे. विद्यापीठांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावून त्या अनुषंगाने कार्य  करण्याची आवश्‍यकता आहे.
- शैलेश वानखेडे, आयटीतज्ज्ञ

भारतीय आयटी कंपन्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ‘मिडल स्किल्ड टेक्‍निकल पर्सन’चा वापर होतो. ‘नॅसकॉम’च्या सर्वेक्षणानुसार आयटी कंपन्यांमधील वीस टक्के मनुष्यबळ कामचलाऊ प्रकारात मोडणारे असल्याचे दिसून येते. आयटी क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात बदल होत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय कंपन्यांना बदलावे लागणार आहे. या स्पर्धेत या मनुष्यबळाचा टिकाव लागणार नाही. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर पैसे खर्च करण्याऐवजी हे प्रशिक्षण विद्यापीठ, महाविद्यालयातूनच मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल. 
- सुमित पाठक, समन्वयक, आयटी सेल

देशातील आयटी क्षेत्र कामासाठी प्रामुख्याने ‘आउटसोर्सिंग’वर अवलंबून आहे. अमेरिका आणि इतर देशांमधील मोठ्या प्रकल्पासाठी केवळ सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी भारतातील आयटी कंपन्यांकडे असते. भारतात अशा प्रकारचे प्रकल्प आल्यास येथील आयटी उद्योगाला ‘बूस्ट’ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी सरकारकडून प्रयत्न अपेक्षित आहे. त्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. भाषेचे ज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे. टेक्‍नॉलॉजीचे आदानप्रदान त्याद्वारे अतिशय सक्षमपणे करता येईल. 
- इंद्रनिल फुके, आयटीतज्ज्ञ

आयटी क्षेत्रात संधी असली तरीही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर अपेक्षित आहे. काळानुरूप बदल करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. आजही बऱ्याच कंपन्यांचा कारभार कामचलाऊ आहे. त्या कंपन्यांमध्ये ‘अनस्किल्ड मॅनपॉवर’ आहे. तथापि, काही कंपन्यांमध्ये चांगलेही काम सुरू आहे.  सध्या या क्षेत्रात मंदी आहे. अशा स्थितीत विकास करण्याचे आव्हान कंपन्यांसमोर आहे. या परिस्थितीतून आयटी क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी संशोधनाचीही गरज आहे. 
- आदित्य जोशी, आयटीतज्ज्ञ

भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि बीपीएम क्षेत्र देशासाठी १६० बिलियन डॉलरचा महसूल देतो. त्याचा विकासदर ९.५ टक्के एवढा आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातही त्याचा वाटा गतवर्षी ९.५ टक्के होता. यावर्षी तो कमी होण्याची शक्‍यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयटी उद्योगामुळे देशाचा विकास अपेक्षित आहे. मात्र, या क्षेत्राचे हित जपण्याकडे दुर्लक्ष आहे. ‘नेटवर्किंग सेक्‍युरिटी’ ते ‘फिजिकल सिक्‍युरिटी’च्या माध्यमातून महत्त्वाची माहिती व तंत्रज्ञान सुरक्षित ठेवता येणे शक्‍य आहे. सरकारकडून यादृष्टीने विचार होण्याची गरज आहे. 
- प्रवीण सेन, प्रोफेसर, एनआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

सॉफ्टवेअर क्षेत्रात देशाने बराच मोठा पल्ला गाठला आहे. जगात पहिल्या पाच क्रमांकामध्ये भारताचा समावेश आहे. मात्र, ‘हार्डवेअर’क्षेत्रात भारत पिछाडीवर आहे. याचे कारण महत्त्वाचे प्रकल्प देशाबाहेर आहेत. भारतातून त्यासाठी केवळ ‘आउटसोर्सिंग’च्या माध्यमातून काम केले जाते. आता अभ्यासक्रमात सॉफ्टवेअरऐवजी हार्डवेअरवर भर देणे गरजेचे आहे. शिवाय, कौशल्यविकासासाठी सरकारवर अवलंबून न राहता महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.  
- अनुपम चौबे, प्रोफेसर, रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

देशात आयटी क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र, तंत्रज्ञानाला पूरक अशा पायाभूत सोयी वाढल्यास नागरिकांच्या फायद्याचे नवे तंत्रज्ञान देता येईल. आयटी कंपन्यांमधील मनुष्यबळाला प्रशिक्षण द्यावे लागते. यात बराच वेळ जातो. मात्र, कंपनीने त्यांच्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा हे प्रशिक्षण विद्यापीठ, महाविद्यालयातूनच मिळाल्यास कंपनीचा वेळ वाचेल. शिवाय ‘हार्डवेअर’निर्मितीच्या दृष्टीने सरकारकडून संधी निर्माण करण्याची गरज आहे. 
- राहुल वैद्य, वेब डिझायनर 

परदेशात वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान फारच कमी कंपन्यांकडे आहे. यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांना नवे प्रकल्प मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेल्या तंत्रज्ञानाला अपग्रेड करण्याचे आव्हान आहे. त्याचप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या तज्ज्ञांची कमतरता आहे. ते प्रशिक्षित तज्ज्ञ तयार करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 
- आनंद औरंगाबादकर, आयटी मार्गदर्शक

आयटी क्षेत्राची विद्यार्थ्यांमध्ये ‘क्रेझ’ दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात भारतामध्ये ज्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास व्हावा त्या प्रमाणात होताना दिसून येत नाही. याची बरीच कारणे आहेत. त्यापैकी प्रशिक्षित युवकांची कमतरता हे कारण प्रमुख आहे. मोजक्‍याच शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जाला प्राधान्य दिले जाते. ही स्थिती बदलायची असेल तर महाविद्यालयस्तरावर कौशल्यविकासाची कास धरावी लागेल. साहजिकच कौशल्यविकासावर आधारित नवे अभ्यासक्रम आणावे लागतील.
- अमिताभ हलदर, आयटी प्राध्यापक, शिवाजी विज्ञान महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com