जमशेदजी टाटांबद्दल अशीही कृतज्ञता ! 

जमशेदजी टाटांबद्दल अशीही कृतज्ञता ! 

नागपूर - उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे अस्तित्व आज भव्यदिव्य पॅलेस आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या निमित्ताने टिकून आहेच. मात्र, गिरण्यांच्या माध्यमातून ज्या हातांना त्यांनी रोजगार दिला तेदेखील आजपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत. चंद्रकांत अंभईकर या निवृत्त गिरणी कामगाराने स्वतः साकारलेली जमशेदजी टाटांची अर्धप्रतिमा सांभाळून ठेवत कृतज्ञता कायम ठेवली आहे. 

स्वावलंबीनगर येथील रहिवासी चंद्रकांत प्रल्हादराव अंभईकर आज 75 वर्षांचे आहेत. पण, ऍल्युमिनिअमच्या धातूने साकारलेली जमशेदजी टाटा यांची भारदस्त अर्धप्रतिमा छातीशी कवटाळून ते आठवणींना उजाळा देत आहेत. 3 मार्चला जमशेदजी टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त पुन्हा एकदा उजळणी मिळाली. चंद्रकांत अंभईकर 1961 साली नागपूरच्या एम्प्रेस मिलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. दोन वर्षे काम केल्यावर ते आयटीआयला नोकरीला लागले. पण, काही वर्षांनी परत एम्प्रेस मिलमध्ये आले आणि तेथूनच निवृत्त झाले. "माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने एम्प्रेस मिलमधून सुरुवात झाली आणि त्यामुळेच आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा होऊ शकलो,' असे ते म्हणतात. एम्प्रेस मिलला 120 वर्षे पूर्ण झाली म्हणून मिलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अंभईकर यांना जमशेदजी टाटा यांचा पुतळा तयार करायला सांगितले. पण, पुतळा करणे शक्‍य नसल्याने ऍल्युमिनिअम धातूच्या दोन अर्धप्रतिमा त्यांनी तयार केल्या. यातील एक प्रतिमा आज टाटांच्या कुठल्यातरी महालात स्थिरावली आहे. पण, दुसरी मात्र चंद्रकांत अंभईकर यांनी आपल्याजवळ जपून ठेवली आहे. आता माजी राष्ट्रपती स्व. डॉ. अब्दुल कलाम यांची अर्धप्रतिमा साकारायची आहे, अशी इच्छा वयाच्या पंचाहत्तरीतही ते व्यक्त करतात. 

"रतन टाटांना भेटायचेय' 
जमशेदजी टाटा यांची अर्धप्रतिमा माझ्याजवळ ठेवण्यापेक्षा ती टाटा कुटुंबीयांकडे सुरक्षित राहील, असे मला वाटते. एम्प्रेस मिलच्या आठवणी सांगणारी ही प्रतिमा मला रतन टाटा यांना सोपवायची आहे. त्यासाठी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन, असेही ते सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com