कामठी, कन्हानमध्ये वीजहानी घटली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - लघुदाब वीज वितरण हानीचे प्रमाण कमी करण्यासह दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महावितरणतर्फे फीडर मॅनेजर योजना राबविली. फीडर मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामठी व कन्हान येथील पाच वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यात यश आले आहे. केवळ 9 महिन्यांच्या काळात या भागातील 672 वीजचोरीच्या घटना पकडल्या आहेत. 

नागपूर - लघुदाब वीज वितरण हानीचे प्रमाण कमी करण्यासह दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महावितरणतर्फे फीडर मॅनेजर योजना राबविली. फीडर मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनामुळे कामठी व कन्हान येथील पाच वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यात यश आले आहे. केवळ 9 महिन्यांच्या काळात या भागातील 672 वीजचोरीच्या घटना पकडल्या आहेत. 

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे "ड्रीम प्रोजेक्‍ट' म्हणून त्यांच्याच मतदार संघातून 2 मे 2016 पासून फीडर मॅनेजर योजना सुरू करण्यात आली. याची अंजनी लॉजिस्टिक्‍सने जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी कामठी 1 वाहिनीवरील वीजहानी 67.20 टक्के, कामठी 2 वाहिनीवरील हानी 59.16 टक्के, नेरी 59.31 टक्के, मोदी वाहिनीवर 39.37 टक्के, तर कन्हान वाहिनीवरील वीजहानीचे प्रमाण 37.80 टक्के होते. 

जानेवारी महिन्यातील नोंदीनुसार, कामठी 1 वाहिनीवरील वितरण हानी 36.47 टक्के, कामठी 2 वाहिनीवरील हानी 48.92 टक्के, नेरी वाहिनीवरील 36.09 टक्के, मोदी वाहिनीवर 29.18 टक्के, तर कन्हान वाहिनीवरील वीज हानीचे प्रमाण 20.52 टक्के आहे. वीजहानी कमी करण्यासाठी पाचही वाहिन्यांवर सुमारे 75 लाख रुपये मूल्याच्या 672 वीजचोऱ्या पकडल्या असून, यापैकी 70 लाखांची वसुलीही केली आहे. 

थकबाकीदारांना शॉक 
पाचही वाहिन्यांवरील 2 हजारांवर ग्राहकांकडील मीटर बदलले. 46 जणांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. वीज बिलांच्या थकबाकीवसुलीसाठी महावितरणच्या प्रयत्नांना मदत करीत 242 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी, तर 253 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे. 

दर्जेदार वीजपुरवठा 
पाचही वीज वाहिन्यांवरील लघुदाब वितरण हानी घटल्याने भारनियमन संपुष्टात आले आहे. शिवाय ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होत आहे. पूर्वी अनधिकृत भार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते. आता ते नियंत्रणात आले आहे. 

फीडर मॅनेजर ही संकल्पना फार चांगली असून, राज्यातील वीज वितरण हानी कमी होऊन वसुलीचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी वीजदर मोठ्या प्रमाणावर कमी करणे शक्‍य होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल. 
- महेंद्र जिचकार, मे. अंजनी लॉजिस्टिक्‍स