सेव्हन हिल्स प्रकरणातील आरोपींबाबत निर्णय राखून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - प्रॉपर्टी डीलरच्या खुनासाठी जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावलेल्या सहा आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अपीलावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. भांडे प्लॉट परिसरातील सेव्हन हिल्स बारमध्ये 10 जानेवारी 2013 ला भरदिवसा ही घटना घडली होती. 

नागपूर - प्रॉपर्टी डीलरच्या खुनासाठी जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावलेल्या सहा आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अपीलावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. भांडे प्लॉट परिसरातील सेव्हन हिल्स बारमध्ये 10 जानेवारी 2013 ला भरदिवसा ही घटना घडली होती. 

जितेंद्र मारोतराव गावंडे (37) याने डिसेंबर 2012 मध्ये तुषार दलाल (31) याला 50 हजार रुपये उधार दिले होते. त्यानंतर पत्नीच्या प्रसूतीकरिता खर्च लागणार असल्याने जितेंद्रने तुषारला पैसे परत मागितले. 10 जानेवारी 2013 ला पैशासाठी फोन केला असता, तुषारने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. संध्याकाळी 5.30 वाजता सेव्हन हिल्स बिअरबार ऍण्ड रेस्टॉरेंटमध्ये बोलवले. तुषार पाच मित्रांसह साडेपाचपूर्वीच बारमध्ये पोहोचला. त्यापैकी चार जण बारमध्ये शिरले; तर दोघे बाहेर उभे राहिले. जितेंद्रदेखील साडेपाच वाजता बारमध्ये पोहोचला. तुषार बार काउंटरवरच जितेंद्रची वाट बघत बसला होता. तेथेच दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तुषारने मित्रांच्या मदतीने जितेंद्रवर चाकूने वार करायला सुरुवात केली. व्यवस्थापक रघुवीर वल्लभदास याने रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही चाकूचा धाक दाखवला. यानंतर सर्व आरोपी पळून गेले. पण, संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे 20 साक्षीदार तपासण्यात आले. सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे आरोपींचे चेहरेही स्पष्ट झाले. सत्र न्यायालयाने 6 मे 2015 ला सहाही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात तुषार साहेबराव दलाल (31), कुणाल मोतीराम मस्के (30), लक्ष्मीकांत ऊर्फ लच्छू रवींद्र फाये (32), अमोला महादेवराव मंडाळे (30), भूपेश ऊर्फ रिंकू विठ्ठलराव टिचकुले (29) आणि समीर सुरेशराव काटकर (29) यांचा समावेश आहे. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सरकारतर्फे ऍड. एम. जे. खान यांनी बाजू मांडली. 

Web Title: Keep the decision about the accused in the Seven Hills case