कोच्छी जलप्रकल्प २३ वर्षांपासून अपूर्ण

सावनेर - कोच्छी जलप्रकल्पाची अपूर्ण कामे.
सावनेर - कोच्छी जलप्रकल्पाची अपूर्ण कामे.

केळवद - हरितक्रांतीसाठी वरदान ठरू शकणारा कोच्छी बॅरेज जलप्रकल्प मागील २३ वर्षांपासून रखडल्याने जिल्ह्यातील सिंचनक्षमता दिवसेंदिवस घटत आहे. सरकार कोणतेही असो निधी किंवा ठोस निर्णयाच्या बाबतीत आजतागायत झालेली चालढकल कोच्छी प्रकल्पाला बरेच वर्षे मागे लोटून गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या जिल्ह्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प असताना तिन वर्षांपासून सत्तेत असलेल्या फडणवीस यांनी या प्रकल्पाला पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची जनतेची ओरड आहे. 

जिल्ह्यातील नदंनवन ठरणाऱ्या कोच्छी बॅंरेज जलप्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९४ला प्रशासकीय मंजुरी दिली. त्यानतंर अनेकदा सत्तांतर झाले. १९९५ ते २००० वर्ष सोडले तर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. परत मागील तीन वर्षांपासून भाजप सेनेचे सरकार आहे.  मात्र, या जलप्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आमदार सुनील केदार यांच्या प्रयत्नाने. २००६  ला त्यानंतरही हा प्रकल्प मागील २३ वर्षांपासून रखडलेला आहे.

उदासीन धोरण
महाराष्ट्र आणी मध्य प्रदेश या दोन राज्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाकरिता १९९४ मध्ये  तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्या प्रयत्नाने २३२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती. प्रकल्पाच्या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य सरकारचे विदर्भाबाबतचे उदासीन धोरण बाधित ठरले.

पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत गावे
कोच्छी प्रकल्पामुळे रायवाडी, ढालगावखैरी, कोच्छी ही गावे बुडीत क्षेत्रात असून या गावाचे पुनर्वसन कासवगतीने सुरू आहे. गावातील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला प्रतिएकर सात ते आठ लक्ष रुपये इतका देणे सुरू असल्याने या गावातील शेतकरी कमालीचे चितिंत आहेत. कारण हा परिसर सोडून येथील शेतकरी जमिनी खरेदीसाठी जात आहे. पिपळा, टेबुरडोंह, चौरखैरी, ढकारा, नंदापूर ही गावे प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या पुराच्या संभाव्य धोक्‍यात येत असल्याने ही  गावेसुद्धा पुनर्वसनाच्या यादीत आहेत. प्रलंबित प्रकल्पाला ऑगस्ट २००७ला राज्य सरकार व वनविभागाच्या मिळालेल्या मंजुरीनुसार २६२कोटी इतका नव्याने निधी मंजूर झाला होता. आता  या प्रकल्पाचा खर्च ९४७ कोटी इतका असून आतापर्यंत ५८६ कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. किमान ४०० कोटीच्या खर्चाची कामे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अपेक्षित आहेत.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य
जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील खेकरानाला जलप्रकल्पाजवळील असलेल्या कोल्हार नदीवर कोच्छी येथे प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे ३९८० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शिवाय नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.

परिसरातील भूजलपातळी वाढून शेती सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला पिण्याचे पाणी काही प्रमाणात देण्यात येणार आहे. कोराडी विद्युत केंद्राला १४.००दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्यात येणार आहे. 

हा प्रकल्प तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असून राज्य सरकार देत असलेल्या निधीमुळे या प्रकल्पाच्या कामाला गती आलेली आहे.
- दिनेश मांडवकर, महामंत्री, तालुका किसान आघाडी, सावनेर.

कोच्छी प्रकल्पामुळे सावनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून नागपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग मोकळा होईल. मात्र, राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास बरीच दिरंगाई होत आहे.
- सतीश लेकुरवाळे, अध्यक्ष, सावनेर तालुका काँग्रेस कमिटी

हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी नंदनवन असून या अपूर्ण प्रकल्पामुळे तालुक्‍यातील सिंचन क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे.
- विवेक मोवाडे,  सरपंच नादांगोमुख

१९९५मध्ये प्रथम या क्षेत्राचा  आमदार झालो. तेव्हापासून प्रकल्पाच्या कामासाठी प्रयत्नशील असून २०१४ ते २०१६ या कालखंडात राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ नये, या भीतीपोटी राज्य सरकारला उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे आता निधी द्यायला सुरुवात केली आहे.
- सुनील केदार, आमदार सावनेर

जून २०१९ पर्यंत हा प्रकल्प नक्‍कीच पूर्ण होईल.
- पद्माकर पाटील

वर्ष २०१३ नुसार पुनर्वसन व्हावे. कोच्छी प्रकल्पामुळे खैरी ढालगाव हे गाव बुडीत क्षेत्रात येत असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतीच्या मोबदल्यात कोरडवाहू तसेच ओलीत अशी शेतीची विभागणी केली. तसेच शेतातील विहीर आणि संत्रा झाडांना गृहीत न घेता शेतकऱ्यांना सरसकट मोबदला देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. वर्ष २०१३नुसार या गावाचे पुनर्वसन झाल्यास येथील शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार.
- श्रीराम ढोके, सरपंच,खैरी ढालगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com