खरीप पिकांना तणाचा विळखा; राज्यभरातील शेतकरी चिंतेत 

खरीप पिकांना तणाचा विळखा; राज्यभरातील शेतकरी चिंतेत 

अकोला : खरिपातील पिके अर्धा फुटही वाढले नाहीत, तर विविध तणाने सर्व पिकांना विळखा घातला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासूनच ५० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात असून, तणाच्या अतिक्रमणामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

शेती उत्पादन वाढविण्याबाबत कृषी विद्यापीठे व सरकारी यंत्रणा विविध योजना, उपक्रम राबवित आहेत. वेगवेगळे प्रयोग, संशोधन, उपाययोजना व प्रयत्न करण्यात आले आहेत. तरीसुद्धा दरवर्षी शेती उत्पादनात कमालीची घट येत आहे. या घटीसाठी शेतीमधील तणाचे अतिक्रमण प्रामुख्याने जबाबदार असून, त्यावर योग्य उपाय शोधण्यात यावा व शेतकऱ्यांपर्यंत तो तत्काळ पोहचवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

विविध संस्था, संघटना तणनाशके वापरण्यास विरोध दर्शवित आहेत. परंतु, तणनाशके वापरली नाहीत, तर ५० ते ६० टक्के शेती उत्पादन घटणार हे निश्चित. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेती उत्पादनावर चालतो. त्यामुळे उत्पादनात घट येणार नाही याची शाश्वती देऊन, तणनाशकाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. 
- गणेश नानोटे, शेतकरी, बार्शीटाकळी 

तणांव्दारे जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये शोषूण घेण्याचे प्रमाण 
पिके अन्नद्रव्ये शोषूण घेण्याचे प्रमाण (कि.ग्रॅ. प्रतिहेक्टर) 
नत्र स्फुरद पालाश 
ज्वारी ३६-४६ ११-१८ ३१-४७ 
तूर २८ २४ १४ 
मूग ८०-१३२ १७-२० ८०-१३० 
सोयाबीन २६-६५ ३-११ ४३-१०२ 
गहू २०-९० २-१३ २८-५४ 
हरभरा २९-५५ ३-८ १५-७२ 

शेतीची उत्तम मशागत, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, पेरणी अगोदर वखराची पाळी, चैफुलीचा वापर, योग्य पिकाची निवड, पीक फेरपालट, आंतरपीक पध्दत, शुध्द प्रमाणीत बियाण्याचा वापर, स्वच्छता, वेळेवर पेरणी, अपेक्षित झाडांची संख्या, विरळणी, संतुलित खताचा वापर, दोन ते तीन वेळा डवरणीच्या पाळ्या व एक ते दोन निंदनाच्या पाळ्या दिल्या, तर कमी खर्चात, वेळेवर, अपेक्षित दर्जाचे तणनियंत्रण शक्य होते. 
- डॉ. जे. पी. देशमुख, कृषिविद्या विभाग, डॉ. पंदेकृवि अकोला 

तण निवारणात्मक उपाय 
जमिनीची पुर्वमशागत, जांभुळवाही करणे, हाताने तणे उपटणे, कोळपणी व खुरपणी, खांदणी करणे, आंतरपीक पध्दती, तणे जाळणे, निर्जिव वस्तुंचा वापर (आच्छादन करणे), पिकांची फेरपालट, जीवाणुंचा वापर, जमिनीवर सौर उर्जेचा वापर करून तणांचे नियंत्रण, रासायनिक तण नियंत्रण इत्यादी उपाययोजना करून तण निवारण करता येते. 

बहुवार्षिक तणांचे नियंत्रण 
खोल नांगरट, त्यानंतर १० ते १५ दिवसाच्या अंतराने वखराच्या पाळ्या द्याव्या. काश्या, मुळे वेचून नष्ट करावी. कमी प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास कुदळीने खोदून मुळ्या व गाठी वेचून जाळून टाकाव्यात. हराळ, लव्हाळ, कांस व कुंदा ६ ते ९ इंच वाढीचे अवस्थेत व पाण्याचा ताण बसलेला नसतांना त्यावर ग्लायफोसेट ४१ एस.एल. तणनाशक १.० ते १.५ टक्के द्रावणाची फवारणी करावी. द्रावणात १ टक्का (१०० ग्रॅम) अमोनियम सल्फेट किंवा युरिया मिसळून द्यावा. आवश्यकता भासल्यास नवीन फुटव्यांवर परत फवारणी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com