काकाचे कुटुंबच संपविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

महागाव (जि. यवतमाळ) - काकाच्या संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याच्या हेतूने  पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव्य कालविणाऱ्या पुतण्याविरुद्घ महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्‍यातील अंबोडा येथे ही घटना नुकतीच उघडकीस आली.

अंबोडा येथील पुरुषोत्तम ठाकरे परिवारासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. लग्नसमारंभ आटोपून परत आले असता, त्यांचा मुलगा धीरज (वय १८) पाणी पिण्यासाठी माठाजवळ गेला. तेथे असलेल्या बाटलीतील पाणी पिले असता दुर्गंध आला. त्यामुळे त्याने माठातील पाणी घेतले. त्या पाण्यावरही तवंग आल्याचे दिसून आले. पाणी पिल्याने धीरजला उलटीचा त्रास सुरू झाला. त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी लगेच धीरजला सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मागील आठवड्यात पुतण्याचा फोन आला होता व त्याने आपल्या कुटुंबाला घरातीलच काही लोकांचा धोका होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले होते. 

ही बाब पुरुषोतम ठाकरे यांच्या लक्षात येताच या घटनेला दुसरा, तिसरा कोणी नसून फोनवर बोलणारा पुतण्याच असल्याचा संशय आला. त्यांनी लगेच पुतण्या परमानंद ठाकरेविरुद्घ महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताविरुद्घ सोमवारी (ता. २४) गुन्हा दाखल केला आहे.