चाकूने वार केलेल्या 'हृदया'वर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या ‘ट्रॉमा केअर युनिट‘चे उद्‌घाटन झाले. परंतु शल्यक्रियागाराअभावी शस्त्रक्रिया सुरू झाल्या नव्हत्या. तब्बल 22 दिवसांनी मंगळवारी (21 जून) ट्रॉमा युनिटमध्ये शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तीन रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हृदयावर चाकूने वार केल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पदनिर्मितीला हिरवी झेंडी मिळाली. संबंधित विभागात डॉक्‍टरांच्या नियुक्ती झाल्या. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी केलेली मोर्चेबांधणी मंगळवारी यशस्वी झाली. सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. मंगळवारी झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये एका रुग्णाच्या पोटाला गुप्त मार होता. पोटातील आतडे फाटले होत्या. यामुळे पोटात रक्तस्त्राव झाला. पंधरा ते वीस मिनिटं रुग्णाला उपचार मिळाले नसते, तर रुग्ण दगावण्याची शक्‍यता होती, असे डॉ. गजभिये म्हणाले. यानंतर भांडणात चाकूने जखमी झालेले दोन रुग्ण उपचारासाठी आले. यातील एका रुग्णाच्या हृदयात चाकू शिरला होता. दोन्ही जखमी रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. तब्बल सहा ते सात तासांत तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. 

ट्रॉमातील दोन्ही शस्त्रक्रियागृहे सुरू झाली आहेत. मध्यवर्ती कृत्रिम श्वासोच्छवासप्रणाली सुरू केली आहे. शल्यक्रियागृह सुरू करण्यापूर्वी आसपासचा परिसर निर्जंतुकीकरण करावा लागतो. आसपासच्या वातावरणातून रुग्णाला संसर्ग होणार याची काळजी घ्यावी लागते. ट्रॉमा युनिटसाठी स्वॅब टेस्टिंगचा अहवाल आल्यानंतर आज तीन गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. 

- डॉ. राज गजभिये, सर्जरी विभागप्रमुख, मेडिकल, नागपूर