कोराडी होणार जागतिक पर्यटन केंद्र - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नागपूर - जगदंबा देवस्थानच्या विकासासह अम्युझमेंट पार्क, तलावाचे सौंदर्यीकरण आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे कोराडी हे मध्य भारतातील जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. ‘सीप्लेन’चे स्वप्नसुद्धा पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.

नागपूर - जगदंबा देवस्थानच्या विकासासह अम्युझमेंट पार्क, तलावाचे सौंदर्यीकरण आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे कोराडी हे मध्य भारतातील जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. ‘सीप्लेन’चे स्वप्नसुद्धा पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.

महानिर्मितीतर्फे कोराडीत उभारण्यात आलेल्या २० खाटांच्या स्वामी विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख पाहुणे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास कुंभारे,  जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोराडीत येणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी. भक्तीसोबतच पर्यटनाचा  आनंद मिळावा, यासाठी पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विवेकानंद मेडिकल मिशनच्या माध्यमातून हे रुग्णालय चालविण्यात येणार आहे. कामगारांसह ग्रामस्थांनी या वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा. कोराडीतील विस्तारित विद्युत प्रकल्पाच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले जाईल, असे ते म्हणाले. 

जयकुमार रावल म्हणाले, ‘विदर्भातील निसर्गसंपदा, व्याघ्र सफारीमुळे जागतिक स्तरावरील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. पुढील दोन वर्षांत नियोजन करून पर्यटकांना इथे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे स्पष्ट केले. बिपीन श्रीमाळी यांचेही भाषण झाले. संचालन मिलिंद राहटगावकर यांनी केले. शंकर शंखपाळे यांनी आभार मानले. दरम्यान, मुख्य अभियंता उमाकांत निखारे, अनंत देवतारे, आरोग्य संचालक संजय जयस्वाल, डॉ. दिलीप गुप्ता यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जगातील मोठे वॉटरपार्क कोराडीत 
कोराडीतील तलावाचा विकास करून जगातील सर्वांत मोठे वॉटरपार्क तयार करण्यात येणार आहे. यासह सीप्लेन, भव्य उद्यान, अम्युजमेंट पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात कोराडी हे वैश्‍विक पर्यटन केंद्र ठरेल. कोराडीतील तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरणासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्राकडूनही १०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी १८६ कोटी रुपयांच्या  विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ८० कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.