लॉ युनिव्हर्सिटीचा कॅम्पस राहणार ‘ग्लोबल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

निर्मितीसाठी जगविख्यात वास्तुविशारदांची निवड; बायो डायजेस्टिव्ह टॉयलेट, सोलर किचन

नागपूर - नागपुरातील महाराष्ट्र लॉ नॅशनल युनिव्हर्सिटीचा वारंगा येथील कॅम्पस उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या १० वास्तुविशारदांची निवड केली आहे. भारतातीलच नव्हे, तर जगातील शैक्षणिक संस्थांपेक्षा सरस आणि आगळावेगळा कॅम्पस उभारण्याचा मानस विद्यापीठाचे कुलगुरू एन. एम. साखरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

नागपूर-वर्धा मार्गावरील वारंगा येथे विद्यापीठाला ७५ एकर जागा देण्यात आली. पूर्णत: ग्रीन बिल्डिंग असलेला हा कॅम्पस देखनीय तसेच इतर शैक्षणिक संस्थांसाठी आदर्श ठरावा यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यापीठाने टॉप-१० वास्तुविशारद निवडण्यासाठी ज्यूरी समिती तयार केली. यात प्रधान सचिव, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्रकुमार, वास्तुविशारदतज्ज्ञ परमजितसिंग आहुजा यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त वास्तुविशारदतज्ज्ञ रोमी घोसला, आशीष गंजू, राहुल मेहरोत्रा व संजय मोहे यांचा समावेश आहे.

या ज्यूरींनी निवडलेल्या १० जणांनी नुकतीच वारंगा येथील जागेला भेट दिली. यानंतर त्यांना आवश्‍यक बांधकाम, सेवा-सुविधा आदींची माहिती दिली. यानुसार हे तज्ज्ञ तीन महिन्यांमध्ये आपापले डिझाइन तयार करणार असल्याचे साखरकर म्हणाले. जागेच्या पाहणीनंतर यासंदर्भात चर्चा केली. यात न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, डॉ. विजेंद्रकुमार, प्रा. सी. रमेशकुमार, निशिकांत जाधव, ॲड. इला सुदामे, परमजितसिंग आहुजा आदी उपस्थित होते.

काय असणार कॅम्पसमध्ये?
प्रदूषणरहित शैक्षणिक परिसरासाठी परिसर ‘व्हेईकल फ्री’ करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय इमारतीपर्यंत इंधनावर आधारित वाहनांना प्रवेश देण्यात येईल.  पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा, बायो डायजेस्टिव्ह टॉयलेट, सोलर किचन आदी अत्याधुनिक संकल्पना येथे राबविण्यात येणार आहेत. वसतिगृह तसेच काही इमारती बहुमजली राहणार असल्याची माहिती साखरकर यांनी दिली. याशिवाय परिसरातील काही भागामध्ये शेती करण्यात येणार आहे. जेणेकरून इथलाच भाजीपाला वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येईल. तसेच दूध डेअरीदेखील उभारण्यात येणार आहे.

Web Title: law university global campus