हरितसेनेच्या मदतीने हिरवळ वाढविणार

हरितसेनेच्या मदतीने हिरवळ वाढविणार

नागपूर - लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्यासाठी हरितसेना उभारण्याची मोहीम राज्य शासनाने आखली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील वनविभागात हरितसेनेच्या स्वयंसेवकाची नोंदणी सुरू आहे. 

राज्यात एक कोटी हरितसेना स्वयंसेवकांच्या नोंदणीचा निर्णय घेतल्याची माहिती सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक डब्ल्यू. आय. ॲडबॉन, उपवनसंरक्षक जे. मल्लिकार्जुन आणि उपसंचालक किशोर मिश्रिकोटकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या तीन वर्षांत एकूण ५० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळासाठी महाराष्ट्र हरितसेना ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा सहभाग वाढून जनजागृती अभियान सक्षमरीत्या उभे राहणार आहे. यात भाग घेऊन वर्षभर कार्य करणाऱ्यांना शासनाकडून गौरविले जाईल. 

स्वयंसेवक यातून विविध वृक्षारोपण, वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षण याबाबत जागरूक होतील.  सामाजिक आणि पर्यावरण बांधीलकी जपत सहभागी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडतील. या अनुभवाचा लाभ वैयक्तिक व व्यावसायिकरीत्या करू शकतील. महाराष्ट्र हरितसेनेत समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती, संस्था, संघटना सहभागी होऊ शकतात. यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येऊ शकते.

स्वयंसेवकांना मिळणार सवलत 
स्वयंसेवकांना विविध वनक्षेत्र, अभयारण्य तसेच व्याघ्रप्रकल्पात लागणाऱ्या प्रवेश शुल्कात  व इतर शुल्कात सवलत देण्याची तरतूद शासनाच्या विचाराधीन आहे.

प्रगणनेत सहभागाची संधी 
राज्यातील प्रत्येक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी, खासगी  संस्थांचे कर्मचारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक व्यक्तिगत स्तरावर सहभागी होऊ शकतात. हरितसेना महाराष्ट्राच्या स्वयंसेवक आणि संस्थांना वनविभागामार्फत आयोजित कार्यक्रमात थेट सहभागी होता येईल. यामध्ये वृक्षलागवड, वृक्षदिंडी, वनांच्या संरक्षणाकरिता सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वनमहोत्सव कालावधीत वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रम व वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणासंबंधित सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित प्रभातफेरी, पथनाट्य, सायकल रॅली आदी जनजागृती कार्यक्रमांमध्येसुद्धा सहभाग या ग्रीन आर्मीला अतिशय वेगळा अनुभव घेता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com