टोकण दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करू - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

बाभूळगाव (जि. यवतमाळ) - खरिपात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने खरेदीप्रक्रियेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, टोकण दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली तूर शेतकऱ्यांच्या नावावर दाखविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला.

जलयुक्त शिवार योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन, पीककर्ज वाटप आदी विषयांचा आढावा तालुकास्तरावर दौरे आयोजित करून घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ग्रामीण भागात घरकुल योजनेची कामे झपाट्याने पूर्ण होत आहेत. मात्र, शहरी भाग मागे पडत असल्याचे ते म्हणाले. गेल्या सरकारने सहा वर्षांत शेतकऱ्यांना कृषिपंपांचे वाटप केले नाही. आम्ही दोन वर्षांत प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याचा दावा त्यांनी केला.

तूरखरेदीबाबत सरकार गंभीर आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आश्‍वस्त केले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून तत्काळ पीककर्ज वाटपाचे निर्देश दिले. आतापर्यंत साडेपाच लाख क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली.