शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमुक्ती - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मूल (जि. चंद्रपूर) - शेतकऱ्यांच्या जीवनात कर्जमुक्तीने परिवर्तन होणार नाही. त्यासाठी शेतीला सिंचनाची सोय, वीज, शेतमालाला बाजारपेठ, कृषी क्षेत्रात गुंतवणूक या गोष्टी आधी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.

वन, अर्थ व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून साकारलेले कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक, सभागृह आणि श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचा लोकार्पण सोहळा आज झाला.

त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया, आमदार नाना श्‍यामकुळे, आमदार ऍड. संजय धोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सक्षम बनविल्याशिवाय शेतकरी कर्जातून बाहेर पडणार नाही; अन्यथा शेतकरी कर्जातच बुडत राहणार. त्यासाठी शेतीला धरून विविध गोष्टी करणे आवश्‍यक आहे. शेतीच्या क्षेत्रात योग्य गुंतवणूक, योग्य बाजारपेठ आणि बाजारभाव मिळाल्यानंतर शेतकरी कोणापुढेही हात पसरवणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केवळ सरसकट कर्जमुक्तीने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे सरकारचे ध्येय असल्याचे फडणवीस म्हणाले.

संघर्ष यात्रेची खिल्ली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडविली. विरोधक पंचवीस टक्‍के लोक यात्रेत जमा करू शकले नाहीत. "एसी' गाडीमध्ये बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नाहीत. त्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी संघर्ष यात्रा शेतकऱ्यांसाठी काढावी लागते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावला.

Web Title: loan waiver to farmers at the right time