'कासोधा'तून देशमुख शोधणार लोकसभेचा मार्ग

Ashish-Deshmukh
Ashish-Deshmukh

अकोला - कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादकांची (कासोधा) परिषद अकोल्यात येत्या 23 रोजी होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून काटोलचे माजी आमदार व भाजपमधून परत पुन्हा कॉंग्रेसवासी झालेले आशिष देशमुख लोकसभा मतदारसंघाचा मार्ग शोधण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर आशिष देशमुख सक्षम व्यासपीठाच्या शोधात आहेत. त्यांचा हा शोध कासोधा परिषदेच्या व्यासपीठावर संपण्याची शक्‍यता आहे. कासोधा परिषदेचे निमित्त करून ते लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघाच्या पर्यायाची चाचपणी करण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. देशमुख यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अशा परिस्थितीत ते अकोला लोकसभा मतदारसंघाचा पर्याय शोधू शकतात. कॉंग्रेसच्या वाटेला असलेल्या या जागेवर अद्याप कोणत्याही उमेदवाराने दावा न केल्याने रिक्त आहे.

वाशीमचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अनंतराव देशमुख यांचा एक पर्याय कॉंग्रेसपुढे खुला आहे. मात्र, ऐनवेळी त्यांनी नकार दिला तर कॉंग्रेसकडे दुसरा सक्षम पर्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.

अशा परिस्थिती अकोला मतदारसंघात आशिष देशमुखच्या रूपाने पर्यायी उमेदवाराचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा कॉंग्रेस वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने ऐनवेळी सहकार क्षेत्रातील अकोट येथील नेते हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली.

भाजपतर्फे मराठा उमेदवार खासदार संजय धोत्रे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली होती. 2019 मध्येही तेच भाजपचे उमेदवार राहणार हे निश्‍चित. त्यांना भारिप-बहुजन महासंघाचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान असेल. प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेससोबत आघाडी न झाल्यास कॉंग्रेसला अकोला लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे.

अशा परिस्थितीत स्थानिक नेत्यांपैकी कोणाचा विचार होणार यावर अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. त्यातच स्थानिक नेत्यांपैकी कोणीही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही. याला अनंतराव देशमुख यांचा अपवाद असला तरी त्यांच्याकडूनही अद्याप निवडणूक लढविण्याबाबत काही हालचाली होताना दिसत नाहीत. ते स्वतःच्या मुलाला नकुल देशमुख यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ऐनवेळी अकोला लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार निवडण्याचा विचार झाल्यास आशिष देशमुख यांचे नाव पुढे येऊ शकते.

जिल्ह्याबाहेर नेत्यांची परंपरा
अकोला लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांपेक्षा जिल्ह्याबाहेर नेत्यांना अधिक पसंती मिळाली आहे. अकोला-वाशीम जिल्ह्यात ही परंपरा वसंतराव साठे, गुलाम नबी आझाद यांनी जोपासली आहे. ही परंपरा आशिष देशमुख यांच्या रुपाने कॉंग्रेस पुढे चालवील का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com