साहित्य संमेलनाची दिल्लीवारी निश्‍चित! 

साहित्य संमेलनाची दिल्लीवारी निश्‍चित! 

नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिल्लीवारी जवळपास निश्‍चित झाली असून, दहा सप्टेंबरच्या बैठकीत त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीची दिल्ली, बडोदा आणि बुलडाण्याची भेट केवळ औपचारिकता ठरणार, असे चित्र सध्या आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती ज्या स्थळावर शिक्कामोर्तब करेल, तेथेच संमेलन होत असते; पण बऱ्याचदा राजकीय हस्तक्षेपामुळेही स्थळ निवड समितीची "मेजॉरिटी' एखाद्या विशिष्ट स्थळाकडे झुकत असते, याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र मुळातच स्थळ निवड समितीतील बहुतांश सदस्य एकाच स्थळाच्या बाजूने असतील, तर राजकीय इच्छा, दबाव किंवा इतर बाबींचा विषयच उरत नाही. अद्याप दिल्ली, बडोदा आणि बुलडाण्यातील हिवरा आश्रम या ठिकाणांना भेटी दिलेल्याच नाहीत. पुढील महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या भेटी देण्यात येतील; परंतु स्थळ निवड समितीतील सहा सदस्य दिल्लीसाठी अनुकूल असून, केवळ मराठवाड्यातील एक सदस्य बडोद्यासाठी आग्रही असल्याचे कळते; मात्र सातपैकी चार सदस्य ज्या स्थळाला पसंती दाखवतील, त्यावरच शिक्कामोर्तब होईल. मराठीला अभिजात दर्जा घोषित होण्यासाठी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विचार यामागे आहे. 

महामंडळातील जवळपास सर्वच सदस्यांचे याबाबत एकमत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळाले. शिवाय महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे दिल्लीतील वर्चस्व, मराठी भाषिकांचे दिल्लीतील अस्तित्व आदी गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणे, अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. येत्या 19 व 20 ऑगस्टला दिल्ली आणि बडोदा येथे महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार आहे. त्यानंतर नऊ सप्टेंबरला बुलडाण्यातील हिवरा आश्रमला समिती भेट देईल आणि आपला अहवाल व शिफारस 10 सप्टेंबरला होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत सादर करेल. त्याचवेळी संमेलनस्थळाची घोषणासुद्धा होईल. 

दिल्लीची चर्चा करणाऱ्यांना स्वातंत्र्य आहे; पण घटनेप्रमाणे स्थळ निवड समिती प्रत्यक्ष पाहणी करून जो काही अहवाल देईल, त्यानुसारच स्थळाविषयी निर्णय घेतला जाईल. 
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com