नक्षलग्रस्त जिजगावाचा बदलला चेहरामोहरा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पाण्याची समस्या सुटली : लोकबिरादरीच्या पुढाकाराने कायापालट; आमटे कुटुंबीयांचा प्रयत्न 

भामरागड - विकासाच्या नावावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही भामरागड तालुक्‍यातील अनेक गावांत वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण व पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नाही. मात्र, लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त जिजगावाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. एकेकाळी येथे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत होती. परंतु, आता येथे नळ योजनेचे पाणी घराघरांत पोहोचले आहे. 

नक्षलग्रस्त नेलगुंडा गावात चार-पाच वर्षांपूर्वी साधना विद्यालयाची झालेली सुरुवात, हे अनिकेत यांच्या नेतृत्वातील पहिले मोठे कार्य. आता एकेक गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी जिजगावची निवड करण्यात आली. भामरागडपासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावरील जिजगाव 850 लोकवस्तीचे गाव आहे. संपूर्ण आदिवासीबहुल, मूलभूत सुविधांचा तसा येथे अभावच. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे; पण तीही असून नसल्यासारखीच; मात्र, मुलांमध्ये शिक्षणाची अभिरुची आहे. त्यामुळे कुणी लोकबिरादरीच्या आश्रमशाळेत शिकतो, तर कुणी शासकीय आश्रमशाळेत. गावातील अजय सीताराम मडावी हा तरुण अलीकडेच पहिला इंजिनिअर झाला. 

काही वर्षांपूर्वी प्रशासनातर्फे हातपंपावर मोटार बसविण्यात आली. परंतु, तब्बल तीन वर्षे ती बंद होती. त्यामुळे पाण्यासाठी महिलांचे हाल होत होते. पावसाळ्यात गढूळ पाणी प्यावे लागत होते. सीताराम मडावी यांनी पाणीटंचाईची समस्या डॉ. अनिकेत आमटे यांना सांगितली. त्याच दिवशी अनिकेतने जिजगावला शुद्ध पाणी देण्याचा विडा उचलला. त्यासाठी वर्गणी गोळा केली. 50 हजार लिटर पाण्यासाठी देशभरातील हितचिंतकांनी एका आवाजात निधीचे "पाट' लोकबिरादरीकडे वळते केले. या निधीतून 40 एकरांतील मालगुजार तलावातील गाळ काढण्यात आला. मोठी पाळही बांधली. यामुळे तलावात भरपूर पाणी तर साचलेच, शिवाय गावकऱ्यांच्या हातालाही काम मिळाले. तलावाचे पाणी गावात आणण्यासाठी 50 हजार लिटरची उंच टाकी बांधण्यात आली. पाइपलाइन टाकून सौरऊर्जा लावण्यात आली आणि गावात घराघरांत नळ पोहोचले. भरउन्हाळ्यातही जिजगावातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. तलाव खोलीकरणामुळे शेतीच्या सिंचनाची सोय झाली. संपूर्ण योजनेसाठी अनिकेत आमटे यांनी खूप परिश्रम घेतले. 

हागणदारीमुक्तीचा निर्धार 
पाण्याची समस्या सोडविण्यापूर्वी गावकऱ्यांनी शौचालय व स्वच्छतागृहाचा नियमित वापर करावा, अशी लोकबिरादरीची अपेक्षा होती. परंतु, या दोन्ही बाबी पाण्याशी निगडित असल्याने आधी पाण्याची समस्या सोडविण्यात आली. नंतर शौचालय आणि स्वच्छतागृहांचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिजगाव लवकरच हागणदारीमुक्त होणार आहे.