एकसंध वज्रमूठ

एकसंध वज्रमूठ

मराठा क्रांती मूक मोर्चाची विधिमंडळावर धडक - मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
नागपूर - कोपर्डी हत्याकांडाचा निषेध, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा- कुणबी समाजाच्या भव्य क्रांती मूक मोर्चाने बुधवारी विधिमंडळावर धडक दिली. तरुणींच्या नेतृत्वात निघालेल्या या मूक मोर्चाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रक्षुब्ध मनांचा निःशब्द हुंकार अनुभवला.

सकल मराठा समाजातर्फे आयोजित या मोर्चाच्या निमित्ताने कुणबी- मराठा बांधवांनी एकसंध वज्रमूठ आवळली.

यशवंत स्टेडियम येथून हजारो मोर्चेकऱ्यांनी चार- चारच्या संख्येने शिस्तबद्ध पद्धतीने विधानभवनाच्या दिशेने आगेकूच केली. प्रारंभी तरुणी, महिला, पुरुष या क्रमाने मोर्चेकरी अगदी शांतपणे चालत होते. मॉरेस कॉलेज टी पॉइंट येथे मोर्चेकऱ्यांना रोखून धरण्यात आले होते. दुपारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत स्वतः मोर्चास्थळी आले. त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या तरुणींशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेची भावना व्यक्त केली. त्यानुसार नेतृत्वकर्त्या तरुणींना ते सन्मानपूर्वक विधानभवनात घेऊन गेले. तरुणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

मोर्चात शिस्त असली तरी प्रत्येकाच्या डोळ्यात कोपर्डीच्या घटनेबद्दलचा तीव्र संताप दिसत होता. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांवरही या मोर्चाचे पडसाद उमटले. दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी याच मुद्द्यावरून तहकूबही झाले. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी जिजाऊ वंदन करून मोर्चाला संबोधित केले. त्यांच्या शब्दांची धार आणि डोळ्यांतील हुंकार मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाढविणारा ठरला. व्यासपीठावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून तरुणींनी दीपप्रज्वलन केले आणि मोर्चाला प्रारंभ झाला. हाती भगवे झेंडे, डोक्‍यावर "मराठा क्रांती मोर्चा' लिहिलेली टोपी व अंगात काळे टी-शर्ट घातलेले युवक अत्यंत शांतपणे मोर्चात चालत होते. मोर्चेकऱ्यांच्या हातात "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', "कोपर्डी घटनेचा निषेध' आदी फलक होते. असंख्य युवक- युवतींनी "मी मराठा' लिहिलेले काळे, भगवे, पिवळे टी-शर्ट परिधान केले होते. "सातबारा कोरा करा', "भीक नाही हक्क मागतोय', "मुला-बाळांना अनाथ करू नका' अशा घोषणांच्या टोप्या घातलेली चिमुकली मुले नाशिकहून दाखल झाली होती. त्र्यंबकेश्‍वरच्या आधारतीर्थ अनाथाश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील ही मुले या मोर्चात सहभागी झाली होती. राज्यभरात निघालेल्या मोर्चांच्या मालिकेतील हा अत्यंत महत्त्वाचा मोर्चा राज्यकर्त्यांना मराठा- कुणबी समाजाच्या मागण्यांवर निश्‍चित कृती करण्यास भाग पाडणारा ठरेल, हे निश्‍चित.

मोर्चेकऱ्यांची पायपीट
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मराठा- कुणबी समाज उपराजधानीत दाखल झाला. सकाळपासूनच मोर्चेकऱ्यांचे थवे यशवंत स्टेडियमच्या दिशेने झेपावल्याचे दिसून येत होते. बाहेरगावावरून आलेल्या मोर्चेकऱ्यांची वाहने फार लांबवर अडविण्यात आली. यामुळे मोर्चेकऱ्यांना लांबवरून पायपीट करावी लागली. या प्रकारासाठी मोर्चेकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
 

मराठा समाजाशी मुंबईत चर्चा करणार - पाटील
मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली. नागपूर अधिवेशनानंतर मुंबई येथे दीर्घ चर्चा करण्यात येईल. त्यासाठी 20-25 जणांचा गट तयार करण्यात येईल असे मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले, अशी महिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळाच्या दोनही सभागृहांत दिली. मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि राज्य शासन यासाठी काय उपाययोजना करीत आहे याची माहिती शिष्टमंडळाला दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com