५५ हजार ४१४ शेतकऱ्यांचे कर्जखाते ‘नील’

farmer
farmer

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंर्तगत जिल्ह्यातील ५५ हजार ४१४ शेतकऱ्यांची कर्जखाती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नील झाली आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत तीन ग्रीन याद्या शासनाच्या ‘महा आयटी’ विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असून, एकूण ४१३ कोटी रुपये प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. शुक्रवारपर्यंत (ता.८) त्यापैकी २३९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे यांनी सांगितले.

पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना अजूनही प्राप्त झाला नव्हता. ऑक्टोबरमध्ये दिवाळीची भेट म्हणून, शासनाने, कर्जमाफीची प्रमाणपत्रे शेतकऱ्यांना वाटली. परंतु, त्यांच्या खात्यावर छदामही जमा झाला नाही. त्यामुळे अनेकांची प्रमाणपत्रे परत घेतली गेली. एवढेच नव्हे तर, अनेक ठिकाणी बँकांकडे जमा झालेली कर्जमाफीची रक्कमही नोव्हेंबरमध्ये शासनाने परत घेतली. त्यामुळे ही कर्जमाफी पूर्णपणे फसवी असल्याचे आरोप चोहीकडून शासनावर होत होते. मात्र, या आठवड्यात कर्जमाफीचे ४१३ कोटी रुपये शासनाने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले असून, त्यापैकी २३९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही झाल्याची दिलासाजनक बाब पुढे आली आहे. 

शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1 लाख १२ हजार ४०६ व राष्ट्रीयकृत बँकेचे ७८ हजार ७८१, असे एकूण 1 लाख ९१ हजार १८३ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार शेतकरी कर्जमाफी संदर्भात शुक्रवारपर्यंत (ता.८) दोन लाख सहा हजार ७२७ शेतकऱ्यांच्या नावासह तीन ग्रीन याद्या शासनाच्या ‘महा आयटी’ विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपलब्ध यादी व पात्रतेनुसार लाभार्थी ५५ हजार ४१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २३९ कोटी रुपये वर्ग करून त्यांची कर्जखाती नील झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गोपाल माळवे यांनी दिली. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत तीन ग्रीन याद्या उपलब्ध झाल्या असून, त्यावर काम सुरू आहे. प्राप्त याद्यानुसार पात्र ५५ हजार ४१४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २३९ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे १२६ कोटी ६७ लाख रुपये मिळाले असून, लवकरच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येईल, अशी माहिती अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे यांनी दिली.  

ग्रीन यादी व शेतकरी संख्या - 
पहिली यादी ६२६१६ शेतकरी 
दुसरी यादी ७२१५७ शेतकरी
तिसरी यादी ७१९५४ शेतकरी
एकूण २०६७२७ शेतकरी

प्राप्त रक्कम -
पहिला टप्पा १२८ कोटी ९६ लाख ४४ हजार ९९४
दुसरा टप्पा १५७ कोटी ९९ लाख
तिसरा टप्पा १२६ कोटी ६७ लाख
एकूण ४१३ कोटी ६२ लाख ४४ हजार ९९४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com