पेरणीसाठी पैसे नसल्याने दगडाची पेरणी करून सरकारचा निषेध!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

राज्यभरात झालेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क दगडाची पेरणी करून सरकारचा निषेध केला आहे.

खामगाव (जि. बुलडाणा) - राज्यभरात झालेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नसल्याचे म्हणत येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क दगडाची पेरणी करून सरकारचा निषेध केला आहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैशाची उणीव भासत आहे. खामगाव तालुक्‍यातील खुटपूरी गोपाल काकडे या शेतकऱ्याच्या शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जमिनीत दगडाची पेरणी करत अनोखे आंदोलन केले आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीची संपूर्ण मशागत झालेली आहे. मात्र शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी आर्थिक टंचाई जाणवत आहे. त्यामुळे खुटपूरी गावातील शेतकऱ्याने त्यांच्या शेतात दगड आणि रेतीची पेरणी करून सरकारचा निषेध केला आहे. यामधून जे उगवेल ते सरकारला विकणार असल्याच्या उद्विग्न भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी श्रीकृष्ण काकडे, विष्णू जुमळे, मारोती बोचरे, स्वाती काकडे, ममता काकडे, संगिता काकडे, शोभा बाठे, शारदा डवगे, शिला डवगे, पांडुरंग घोडसे, सुनील घोरपडे, गजानन गवळी, मोहन अढायचे, तुकाराम बोचरे, पांडुरंग काकडे, देवराम घोरपडे, श्रीराम घोरपडे, दीपक अढायके, विकी बुलबुले, प्रवीण गवळी, प्रशांत बोचरे आदी शेतकरी व महिला उपस्थित होते.