शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष देवांग यांचे हृदय विकाराने निधन

Ravi Devang
Ravi Devang

शेगाव (जि.बुलडाणा)  ः शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष धुळे येथील रवी जगन्नाथ देवांग (६३) हे शेगाव येथे शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमानंतर शासकीय विश्रामगृहात पोहोचले असताना त्यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
शेगाव येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शासकीय विश्रामगृहात पोहोचले. तेथे कार्यकर्त्यांसह ते घोषणा देत असतानाच देवांग यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्यात आणि ते तेथेच कोसळले. माजी आमदार वामनराव चटप, अनिल घनवट, ललित बहाळे आदी पदाधिकारी त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल करण्यासाठी निघाले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

रवी देवांग यांची पार्श्‍वभूमी
शिरूड (ता. धुळे) हे रवी देवांग यांचे मूळ गाव. त्यांचे वडील सहकार विभागात लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. राष्ट्र सेवा दलाचे लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार. त्यामुळे सुरवातीपासून पुरोगामी विचारांची त्यांची बैठक होती. राष्ट्र सेवा दल प्रणीत विविध संस्था, आंदोलनांत ते पूर्वीपासून कार्यरत होते. जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. जनता पार्टीचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंह तेव्हापासून ते पक्षात कार्यरत होते.

शरद जोशींचे सहकारी
या सर्व पार्श्‍वभूमीमुळे नंतर ते शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेकडे आकर्षित झाले. त्यांच्यासोबत ते दीर्घकाळ कार्यरत राहिले. शरद जोशी यांच्यानंतरही ते संघटनेचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि शेवटपर्यंत शेतकरी संघटनेत कार्यरत राहिले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर त्यांनी अनेक आंदोलने उभारली. महागाई, शेतमालाला हमीभाव आदी प्रश्‍नांवर लढा देताना अनेकदा कारागृहातही गेले. महात्मा गांधी, साने गुरुजी, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांचा अधिक प्रभाव त्यांच्यावर राहिला.

आर्किटेक्‍ट म्हणून काम
आर्किटेक्‍ट म्हणून शहरासह जिल्ह्यात त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. सातपुडा कारखाना पुरस्कृत काही उपसा सिंचन योजनांचे कामही त्यांनी केले होते. हाउसिंग सोसायट्यांचे बांधकाम केले. स्वतंत्ररीत्या विविध इमारती, प्रकल्पांचे रचना (प्लॅन) तयार केले होते. त्यांनी शहरातील नेहरू चौकातील निर्मिती कार्यालयात सामाजिक, राजकीय ऍक्‍टिव्हिटी चालत होत्या. किसान सहकारी स्टार्च फॅक्‍टरीच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा सहभाग. जनता सहकारी बॅंकेचे काही काळ संचालकही होते. डेडरगाव येथील विपश्‍यना केंद्र उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान राहिले. विवाहाचे अनेक प्रस्ताव नम्रपणे नाकारून ते जाणीवपूर्वक अविवाहित राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com