बीफ पार्ट्या करणाऱ्यांनी डुकराचे मांस वाटून दाखवावे: डॉ. जैन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

हिंमत असेल तर बीफच्या पार्ट्या करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी डुकराचे मांस वाटून दाखवावे, या शब्दांमध्ये हल्ला चढवित आज (रविवार) विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी गोहत्याबंदी कायद्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय षड्‌यंत्र सुरू असल्याचा दावा केला.

नागपूर - हिंमत असेल तर बीफच्या पार्ट्या करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी डुकराचे मांस वाटून दाखवावे, या शब्दांमध्ये हल्ला चढवित आज (रविवार) विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी गोहत्याबंदी कायद्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय षड्‌यंत्र सुरू असल्याचा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी गोहत्याबंदी कायदा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी चरणबद्ध पद्धतीने लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

डॉ. जैन आज एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते गोहत्या करून गायीचे कच्चे मांस खाण्याचा प्रकार करीत आहेत. या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी डुकराच्या मांसाच्या पार्ट्या करून दाखवाव्यात, असे आव्हान त्यांनी काँग्रेस नेत्यांना केले. महात्मा गांधींनी गोरक्षेला केंद्रबिंदू केले होते. त्याच गांधींची काँग्रेस आज राहुल गांधींच्या नेतृत्वात बीफ पार्ट्या करीत आहे. हे देशासाठी हानीकारक आहे. पशु क्रूरतेवर आवाज उठविणारे बुद्धीजीवी या क्रुरतेवर गप्प का आहेत? देशातील देशद्रोही शक्तीला साथ देणारे लोक गोहत्येला विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने राज्यात गोहत्येला बंदी असणारा कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात भाजपने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची सरकारने त्वरित पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली. येत्या दोन वर्षात मोदी सरकार गोहत्या बंदीचा कायदा आणेल, असा विश्‍वास व्यक्त करून ते म्हणाले, तसे न घडल्यास या सरकारचाही विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदी-योगी कॉम्बिनेशन
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न चर्चेतून सुटू शकत नसल्याने सरकारने राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील योगी सरकार व केंद्रातील मोदी सरकार हा प्रश्‍न सोडवतील, असा विश्‍वास असल्याचे जैन यांनी व्यक्त केला. तसे न झाल्यास जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

रेशीमबागेतून सरकार चालत नाही
मोदी सरकार आणि संघप्रणित विविध संघटनांमध्ये असलेला विसंवाद, परस्पर विरोधी भूमिका यावरून केंद्र सरकार रेशीमबागेतून चालत नाही, हेच सिद्ध होत असल्याचे डॉ. जैन म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय मजदूर संघ, धर्मजागरण मंच तसेच विहिंप आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये काही मुद्यांवर मतभेद दिसून आले आहेत.