संघर्षातून यशाची गुढी उभारणारे यशवंत

संघर्षातून यशाची गुढी उभारणारे यशवंत

महाराष्ट्राचा नवा सूर श्रीनिधी घटाटे!
नागपुरातील छोट्या-मोठ्या मैफलींमधून रसिकांच्या मनात आपल्या स्वरांची जादू पेरणारी श्रीनिधी घटाटे आज महाराष्ट्राचा नवा सूर म्हणून नावारूपाला येत आहे. सायंटिफिक आणि देशपांडे सभागृहात गाणी गाता गाता आपल्या गावातली लेक शंकर महादेवन या दिग्गज गायकासोबत जगभरातील रसिकांवर मोहिनी करू लागली आणि तरीही तिचे पाय जमिनीवरच आहेत, ही नक्कीच कौतुकाची बाब ठरते. सूरमणी पं. प्रभाकर देशकर यांच्या तालमीत शास्त्रीय संगीताचे धडे घेणारी श्रीनिधी अनेकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. अगदीच आठवणीतला किस्सा सांगायचा झाला, तर सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या मैफलीचे उदाहरण देता येईल. नागपुरातील एका महोत्सवात राहुलचे शास्त्रीय गायन होणार होते. सभागृह खचाखच भरलेले होते. पण, राहुलची मैफल सुरू होण्यापूर्वी श्रीनिधीचे शास्त्रीय गायन झाले. त्यावेळी मिळालेली दाद श्रीनिधीच्या तर कायम स्मरणात आहेच; पण नागपूरकर श्रोतेही विसरू शकलेले नाही. त्यामुळे पुढे ज्या  ज्या कार्यक्रमांमध्ये श्रीनिधीचे गाणे असेल श्रोत्यांची गर्दी वाढू लागली. शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असल्यामुळे श्रीनिधीला सुगम संगीतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता आली. कुठल्याही धाटणीचे, कोणत्याही काळातील आणि कोणत्याही गायकाचे गाणे ती अतिशय उत्तम पद्धतीने गाते. त्यामुळेच सुप्रसिद्ध संगीतकार-गायक शंकर महादेवन यांनी एका क्षणात तिच्यातील कॅलिबर ओळखले आणि व्यावसायिक तालीम दिली. श्रीनिधीनेही ते फार वेगाने आत्मसात केले. बघता बघता शंकर महादेवन यांच्या ग्रुपमधील एक अत्यंत महत्त्वाची गायिका म्हणून श्रीनिधीने देशभर ओळख मिळवली. तिने स्वतः संगीतबद्ध केलेली गाणी यूट्यूबवरून प्रसिद्ध झाली. ‘टीटीएमएम’, ‘वन वे तिकीट’ या चित्रपटांसाठी तिने गाणीही गायली आहेत. ‘बस तेरी राह’, ‘आगे क्‍या’ या गाण्यांनी सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने हीट्‌स मिळविले. एका वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमधून श्रीनिधीच्या मराठमोळ्या स्वरांची नवी ओळख महाराष्ट्राला होत आहे. संगीताच्या तालावर स्वतःच्या कर्तृत्वाची गुढी उभारणारी श्रीनिधी महाराष्ट्राचा अभिमान ठरतेय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

**********************************************************
खडतर प्रवासातून  गाठले ‘आयपीएस’
भारतीय प्रशासकीय सेवा भल्याभल्यांना आकर्षित करीत असते. लाखो मुले प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी मेहनत करीत असतात. त्यापैकी मोजक्‍यांनाच प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे भाग्य लाभते. लोहित मतानी त्यापैकीच एक आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर २०१४ साली भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) प्रवेश मिळविला. आज लोहित रामटेक येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.  राजस्थानमधील कोटा गावातील असलेले लोहित मतानी यांचे वडील एनटीपीसीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. मात्र, वडिलांची वारंवार बदली होत असल्याने कायम भटकंती करावी लागत होती. बारावीनंतर अभियांत्रिकेच्या शिक्षणासाठी बनारस हिंदी विश्‍वविद्यापीठात गाठले. प्रशासकीय सेवेत जाण्याचा माझा विचार कायम मनात घोळ करीत होता. त्यासाठी शास्त्रज्ञ होण्याचे निश्‍चित केले. आयआयटी बनारस येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तीन वर्षे संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित केले. वडील एनटीपीसीमध्ये असल्याने वीजपुरवठ्यामध्ये होत असलेल्या अडचणीची जाणीव होती. त्यावर पर्याय म्हणून लोहित यांनी ‘वायरलेस पॉवर ट्रान्समिशन’चा शोध लावला. त्याचे डिझाइनही तयार केले. मात्र, त्याला लागणारे मटेरियल, रोप व डिझाइन प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा खर्च भरपूर असल्याचे लक्षात आले. हे तंत्रज्ञान विदेशात वापरण्यात येत असले तरी भारतात वापरणे अशक्‍य असल्याचे जाणले. लोकोपयोगी प्रकल्प नसून उच्चभ्रू देशातील नागरिकांसाठी असल्याची जाणीव लोहित यांना झाली. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. २०१४ च्या यूपीएससीच्या परीक्षेत त्यांनी यश मिळविले आणि त्यांची भारतीय पोलिस सेवेसाठी निवड झाली. ‘इंटरनल सिक्‍युरिटी’ या विषयावरील त्यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय वाचनीय आहे.

**********************************************************
समस्येतून संधी शोधणारा युवा उद्योजक 
प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत. माझ्यापुढे मोठी समस्या होती. त्यातून मार्ग काढला. त्यामुळे उद्योजक होऊ शकलो. तुम्हीसुद्धा समस्येत संधी शोधून मार्ग काढा नि यशस्वी व्हा, असा सल्ला उद्योजक यशवंत रामदास कुर्वे यांनी दिला. 
ग्राहकाच्या खिशात नव्हे, हृदयात स्थान निर्माण करा, असेही ते म्हणाले. यशवंत यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यातील पवना खुर्द येथे झाला. आईवडील शेतमजुरी करायचे. महाविद्यालयीन शिक्षण अड्याळ येथे घेत असताना पेपर वाटले. जनसंपर्क वाढल्याने लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. तीन वर्षे नागपुरात अड्याळ परिसरातील ग्राहकांना प्लॉट दाखवून रिअल इस्टेट एजंट म्हणून काम केले. अड्याळवरून नागपूरला दुचाकीने जाणे-येणे सुरू होते. सकाळी पेपर वाटप करायचे आणि त्यानंतर एजंट म्हणून प्लॉट खरेदी करून द्यायचे. दरम्यान, ज्याच्याकडून प्लॉट खरेदी करून दिले त्यांचा मृत्यू झाला. शेतजमीन त्यांच्या नावावर नव्हती. त्यामुळे २७ ग्राहकांचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही फार मोठी समस्या होती. सहा महिन्यांची मुदत ग्राहकांना मागितली. जे झाले ते त्यांना सांगितले. त्यांनीही समजून घेतले. एजंट म्हणून काम करत असताना मिळालेले कमिशनचे एक लाख रुपये होते. त्यातून पिपळा (हुडकेश्‍वर) येथे सहा एकर जागेचा सौदा केला. दीड वर्षात पूर्ण रक्कम देण्याचे शेतमालकाला आश्‍वासन दिले. ग्राहकांना त्या जागेत प्लॉट दिले. शिवाय नवीन ग्राहक शोधले. प्रामाणिकपणामुळे ग्राहकांनी साथ दिली. वर्षभरात सर्व प्लॉट विकले. त्यामुळे नुकसान भरून निघाले. झालेल्या समस्येवर उपाय शोधला. त्यामुळे उद्योजक म्हणून उभा राहू शकलो. आता स्वतःचे काही ले-आउट आहेत. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल होते. गेल्या १० वर्षांतील मेहनतीचे हे फळ आहे, असेही ते म्हणाले.  

**********************************************************
व्यवसायाची उभारली यशस्वी गुढी
व्यवसायात अडचणी, आर्थिक चणचण हे अपेक्षितच आहे. तरीही जिद्द, इमानइतबारे कार्य करण्याची सवय या जोरावर अनेकांनी भरारी घेतली आहे. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे मधुसूदन रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय मधुकरराव उगले. त्यांचा व्यवसायातील प्रवास व्यवसायात झेप घेऊ पाहणाऱ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे.  त्यांच्या वडिलांची रॉकेलची एजन्सी होती. वडीलांच्या निधनानंतर काही दिवसांत आईने वडिलांची रॉकेलची एजन्सी सांभाळण्याचा निश्‍चिय केला. त्यांच्यासोबत तिन्ही भांवडेही काम करीत होती. शिक्षणाकडे हवे तसे लक्ष नव्हते. बारावीतच त्याने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. एका प्रॉपटी डिलरकडे ऑफीस बॉयची नोकरी केली. तेथेच ले-आउटच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळवली आणि १९९३ साली ले-आउटचा व्यवसाय सुरू केला. वर्धा रोडवरील कलकुही येथे नऊ एकर जागा खरेदीचा करार केला. ओळखीच्या व्यक्तींनी गुंतवणूक म्हणून तेथे प्लॉटही घेतले. २००० साली मिहान-सेझ प्रकल्प याच जमिनीवर आला. कलकुही येथील संपूर्ण जमीन शासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला. शासनाकडून जमिनीचा मोबदला मिळणार होता हे जरी खरे असले तरी विकलेले प्लॉट आणि शासनाकडून मिळणारा मोबदला यात ताळमेळ जुळत नव्हता. शासकीय प्रकल्प येणार असल्याने विरोध करायचा नाही, हा निश्‍चय त्यांनी केला. मिहानसारखा मोठा प्रकल्प येणार विदर्भाचा विकास होणार, अशा अनेक घोषणा झाल्याने प्लॉटधारकांची समजूतही घातली. पैसे परत करण्याची हमीही दिली. त्यात त्याला आर्थिक फटका बसला. 

सकारात्मक दृष्टिकोन असल्याने संजयने पुन्हा फिनिक्‍स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी कामाला सुरुवात केली. दीड लाखाचे वैयक्तित कर्ज घेतले. हिंगणाजवळील वानाडोंगरी येथे क्रांतिभाई टांक यांच्याकडून शेत घेतले आणि ले-आउट टाकले. त्या प्लॉटला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अपयशात खचून न जाता त्यांनी जोमाने व्यवसायाची यशस्वी गुढी उभारली. त्यानंतर इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल सुरू करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता आणि प्रामाणिकतेचा फंडा या व्यवसायातही अवलंबला आणि यश संपादन केले.

**********************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com