टायरपासून तेल करण्याचा कारखाना बंद करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

गोरेगाव-ठाणा रस्त्यावरील झांजिया गावाजवळ जुने टायर जाळून तेल तयार करण्याचा कारखाना बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात शुक्रवारी तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन देण्यात आले आहे.

गोरेगाव (गोंदिया) - गोरेगाव-ठाणा रस्त्यावरील झांजिया गावाजवळ जुने टायर जाळून तेल तयार करण्याचा कारखाना बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात शुक्रवारी तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन देण्यात आले आहे.

झांजिया गावाजवळ अग्रवाल नावाच्या एका शेतकऱ्याने सहा वर्षांपूर्वी औद्योगिक उपयोग करणार असल्याचे सांगत कृषक जमिनीला अकृषिक परवाना घेतला होता. मात्र वास्तवात त्याने तेथे जुने टायर जाळून त्यापासून तेल काढण्याचा कारखाना सुरू केला. या कारखान्यामुळे परिसरातील दोन किलोमीटर अंतरापर्यंत धूर पसरून प्रदूषण होत आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना दमा, फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या कारखान्याजवळ सुरेश चन्ने, भय्यालाल खोब्रागडे, निलकंठ कटरे, डॉ. रुस्तम येडे, सूरजलाल कोल्हारे, दयाराम राऊत, देवीदास धपाडे, मुरलीधार मलेवार, बंडु कटरे यांची शेती आहे. या शेतातील पिकांवर कारखान्यातून येणारी काळी राख उडून पिकांचे नुकसान होत आहे. यातीळ काळे दुर्गंधीयुक्त पाणी निलकंठ कटरे यांच्या शेतात व पांगोली नदीत टाकण्यात येते. यामुळे माणसांसह पिकांना आणि जनावरांना बाधा पोहोचत असल्याचे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगरसेवक डॉ. रुस्तम येडे, सुरेश चन्ने, सुरेश साठवणे, भय्यालाल खोब्रागडे, निलकंठ कटरे, गंगाराम दिहारी, नारायण राऊत, सुरजलाल कोल्हारे, व्यंकट कटरे, रविन्द्र बिसेन, देविदास धपाडे, सुनिल मिश्रा उपस्थित होते.

जुने टायर जाळून तेल काढण्याचा कारखाना अग्रवाल यांनी झांजियाजवळ सुरू केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. नायब तहसिलदारांमार्फत या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल.
- तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गोरेगाव