राणे साहेब, भाजपमध्ये जायचं नसेल तर रिपब्लिकन पक्षात या! : रामदास आठवले 

श्रीधर ढगे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

खामगाव (बुलडाणा) : 'कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील' असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 'भाजपमध्ये गेले नाहीत, तर राणे यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षात यावे' असे आवाहनही त्यांनी केले. बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी काल (शुक्रवार) सायंकाळी खामगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. 

राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राणे कोणत्या पक्षात जाणार, याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत रामदास आठवले यांनाही प्रश्‍न विचारण्यात आला. 

'राणे यांनी त्यांचा मार्ग शोधला आहे. ते लवकरच भाजपमध्ये जातील. मार्ग शोधला आहे, म्हणूनच त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांना भाजपत प्रवेश मिळेल. राणे भाजपमध्ये गेले नाहीत, तर माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांना घेण्याची माझी तयारी आहे', अशी भूमिका आठवले यांनी घेतली. 

'सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे पत्रकार आणि सामान्य नागरिकांना पोलिस नोटीस बजावत आहेत, ही मुस्कटदाबी नाही का' असा प्रश्‍न आठवले यांना विचारण्यात आला. यावर आठवले म्हणाले, "सोशल मीडियावर लिहिण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे; मात्र कुणाचीही बदनामी होईल, अशा पोस्ट टाकू नये. पोलिसांनीही पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर गदा आणू नये.''