अखंड भारतातील नागरिकांचा ‘डीएनए’ एकच - डॉ. मोहन भागवत

अखंड भारतातील नागरिकांचा ‘डीएनए’ एकच - डॉ. मोहन भागवत

नागपूर - काश्‍मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्याला कुणीही भारतापासून वेगळे करू शकत नाही, याचा पुनरुच्चार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारत अखंड देश असून, सर्वांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे सांगितले. 

जम्मू-काश्‍मीर अध्ययन केंद्रातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित ‘सप्तसिंधू’ जम्मू-काश्‍मीर लद्दाख महा-उत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले, काश्‍मीरमध्ये जी समस्या आहे, तीच संपूर्ण देशभर आहे. ही समस्या बाहेरून निर्माण झालेली नसून, आतूनच आलेली आहे. याचे मूळ कारण म्हणजे आज आपण आपली एकता विसरत आहोत. 

त्यामुळे दुरावा निर्माण होत असून, स्वार्थाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे देश तुकड्या-तुकड्यांमध्ये वाटला जात आहे. तेव्हा आपल्यामधील एकात्मतेचा भाव जागृत करून त्याचा प्रचार-प्रसार केल्यास जे प्रश्‍न निर्माण झालेले आहेत, ते सोडविता येणे शक्‍य होईल. त्यासाठी केवळ सत्यच नव्हे तर शक्ती आणि भक्तीचाही उपयोग करावा लागेल. जम्मू- काश्‍मीर आणि लद्दाखचा इतिहास मोठा आहे. त्या इतिहासात देशातील संस्कृतीचा वास आहे. ती संस्कृती वाचविण्यासाठी सरकारकडून मदत होत आहे. मात्र, काही लोक त्यात कुरापती करीत आहेत. त्यांना दुसऱ्या भाषेत उत्तर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी मिझोरमचे राज्यपाल निर्भय शर्मा, सेंटरचे अध्यक्ष जवाहरलाल कौल, नागपूर अध्यक्षा मीरा खडक्कार, सचिव चारुदत्त कहू, उपाध्यक्ष अवतार कृष्णा रैना उपस्थित होते.  

दगडफेकीमुळे आपलेच नुकसान 
जम्मू-काश्‍मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरुद्ध भडकाविण्याचे काम केले जाते. यातूनच काश्‍मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात बोलताना डॉ. भागवत म्हणाले, काश्‍मीर परिसरात जे काही आहे, ते सरकारचे आहे. सरकार आपले असल्याने दगडफेकीतून युवक आपल्याच संपत्तीचे नुकसान करीत आहेत. सरकारकडून मदत मिळत असताना, त्याचा वापर योग्य व्हावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

हिंदुत्वाच्या विचार दुटप्पीपणा नव्हे - निर्भय शर्मा 
काश्‍मीर भारताचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र, काही लोक तो भारतीय भाग नसल्याचा भ्रम निर्माण करीत आहेत. जरासे त्यात हिंदुत्वासाठी काम केल्यास दुटप्पी धोरण असल्याची टीका केली जाते. मात्र, हिंदुत्वाचा विचार करणे दुटप्पीपणा नसल्याचे मत मिझोरमचे राज्यपाल निर्भय शर्मा यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी काश्‍मीरचा खरा इतिहास अभ्यासक्रमात आणून काही संवैधानिक बदल करण्याची गरज असल्याचे मत मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com