विस्कळीत ‘आपली बस’ ताळ्यावर

Bus
Bus

नागपूर - दोन दिवसांपासून विस्कळीत शहर बससेवा आज तिसऱ्या दिवशी ताळ्यावर आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान, शहर बस व्यवस्थापनाची जबाबदारी असलेली ‘डिम्स’ या कंपनीचे कर्मचारी संपकाळात गायब असल्याने कंपनीवर दंड ठोठावण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे. संपावर गेलेल्यांबाबत आंदोलनातील फोटोवरून खात्री  करून घेण्यात येत असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

मंगळवारी शिवसेनाप्रणित कामगार सेनेने शहर बससेवेची चाके बंद पाडली. महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि कामगार सेनेत यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला. महापालिका परिवहन विभाग आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, नागरिकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु कामगार सेना संपावर ठाम असल्याने नाईलाजास्तव राज्य शासनाकडे ‘मेस्मा’ लावण्याची  शिफारस केली. ‘मेस्मा’ लागू झाल्यानंतरही कंत्राटी कामगार असल्याने तो आमच्यावर लागू होत नाही, अशी भूमिका कामगार सेनेने घेतली. त्यामुळे मंगळवारनंतर बुधवारीही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, परीक्षेचा काळ बघता महापालिकेनेने बुधवारी निःशुल्क बससेवा काही चालकांना घेऊन सुरू केली. बोटावर मोजण्याइतपत आंदोलकांचा अपवादवगळता इतर चालक व वाहक आज कामावर परत आले. आज सकाळी सहा वाजतापासून रस्त्यावर ३५३ बस सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यात हंसा ट्रॅव्हल्स कंपनी, आर. के. ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रत्येकी ११२, ट्रॅव्हल्स टाईमच्या १०४, स्कॅनियाच्या २५ ग्रीन बसचा समावेश आहे. त्यामुळे आज नागपूरकरांना दिलासा मिळाला. या बससाठी ५११ वाहक सेवेत होते. दरम्यान, बस चालविण्याची जबाबदारी असलेली ‘डिम्स’ कंपनीचे अधिकारी, कर्मचारी संपकाळात गायब झाले.

त्यामुळे महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत या कंपनीला नोटीस बजावून विचारणा केली. या कंपनीवर दंड ठोठावण्याचीही तयारी प्रशासनाने केली आहे.

सहा महिन्यांपर्यंत संपावर बंदी
कामगार सेनेच्या संपाला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परीरक्षण अधिनियम (मेस्मा) लागू केला. लोकहित ध्यानात घेऊन संपास मनाईचा आदेश काढल्यापासून सहा महिन्यांपर्यंत तो वैध असतो, असे मनपातील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पुढील सहा महिने कर्मचाऱ्यांना संप करता येणार आहे.  ‘एस्मा’चा कालावधी वाढविण्याची शक्‍यताही अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com