बस कर्मचाऱ्यांचा संप एस्माच्या भीतीने मागे

Bus
Bus

नागपूर - एस्माच्या भीतीने संप मागे घेतल्याचे जाहीर करून भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर महापालिका प्रशासन आणि पोलिसांचीच बुधवारी परीक्षा घेतली. एवढेच नव्हे तर  विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बाहेरच्या चालकांकडून सुरू केलेल्या बसवर दगडफेक केली. काही चालकांना धमक्‍यासुद्धा दिल्या. यामुळे १८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. या घडामोडीनंतर दुपारी तीन वाजतानंतर बस व्यवस्था सुरळीत करण्यात परिवहन समितीला यश आले. 

किमान वेतनाच्या मागणीसाठी आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. पटवर्धन ग्राउंडसमोर आमरण उपोषणालाही सुरुवात केली होती. ऐन परीक्षेच्या तोंडावर संप पुकारल्याने महापालिका प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. तोडग्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर राज्य शासनाने एस्मा लावला. सायंकाळी सहा वाजता एस्माचा आदेश धडकला. यामुळे कर्मचारी हादरले. अटक होऊ नये व कारवाई टाळण्यासाठी मंगळवारी रात्री बारा वाजताच संप मागे घेतल्याचे कामगार सेनेने जाहीर केले. दुसरीकडे कामावर जायचे नाही असे ठरवून सर्वांना गाफील ठेवले. संप मागे घेतल्याचे जाहीर केल्यामुळे परिवहन समिती आणि पोलिसही निश्‍चिंत होते. मात्र सकाळी सात वाजपेर्यंत एकही कर्मचारी कामावर आला नसल्याने पुन्हा धावपळ सुरू झाली. परीक्षार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हंसा कंपनीच्या ५० चालकांना तातडीने बोलावण्यात आले. साडेआड वाजता पहिली बस सोडण्यात आली. 

शहराच्या टोकावर असलेल्या परीक्षा केंद्रावर मोफत बससेवा पुरविण्यात आली.

हिंगण्यात दगडफेक
बाहरेच्या चालकांकडून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली बस हिंगणा मार्गावर वाहतूक सेनेच्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक करून अडवली. सर्व प्रवाशांना खाली उतरवून पुन्हा बस सुरू केल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सत्ताधाऱ्यांनी केला एस्माचा गैरवापर
आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने संप पुढे ढकलला आहे. मात्र सत्ताधारी भाजपने एस्मा कायद्याचा गैरवापर केला. रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एस्मा कसा काय लावला जाऊ शकतो, असा सवाल कामगारांचे नेते बंडू तळवेकर यांनी केला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचा कायदा आहे. याकरिता आंदोलन करण्यात काही गैर नाही. आमची चर्चेची पूर्ण तयारी होती.

परिवहन समिती आणि महापालिकेतर्फे कोणीही चर्चेला आले नाही. यामुळे नाइलाजाने आम्ही संप पुकारल्याचे बंडू तळवेकर यांनी सांगितले.

आंदोलनाला शिवसेनेची फूस
संपासाठी शिवसेनेचे तथाकथित नेते बंडू तळवेकर यांनी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे तर संप मागे घेतल्याचे जाहीर करून प्रशासनाची दिशाभूल केली. यामुळे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून वारंवार संपाला बाध्य करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले. संपामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल मी समस्त प्रवाशांची माफी मागतो. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता कळमना, हिंगणा, पारडी, खापरी आदी भागांतील परीक्षा केंद्रांवर मोफत सेवा देण्यात आल्याचे बंटी कुकडे यांनी सांगितले.

पोलिसांचे हातावर हात 
सायंकाळी सहा वाजता एस्माचा आदेश शहरात धडकला होता. गृहविभागाकडे त्याच्या प्रती पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार रात्रीच पोलिसांनी संप मोडून काढण्याची गरज होती. फक्त बसस्थानकांवर पोलिसांना तैनात ठेवले. आमच्याकडे आदेश आला नाही. कारवाई करण्याचे कुठलेच आदेश नसल्याचे सांगून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. दुपारपर्यंत एकही कर्मचारी कामावर आला नसतानाही पोलिसांनी काहीच केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com