कळमन्‍यात गोदामाला आग

कळमना - आगीमुळे इमारत कोसळण्याची शक्‍यता बघता भिंत पाडण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन जवान.
कळमना - आगीमुळे इमारत कोसळण्याची शक्‍यता बघता भिंत पाडण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन जवान.

नागपूर - कळमना येथील कॅलिप्सो ॲग्रो इंड्रस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामाला लागलेल्या आगीत कोट्यवधींच्या धान्याची राखरांगोळी झाली. आगीवर नियंत्रणासाठी सिव्हिल लाइनसह शहरातील आठही अग्निशमन स्थानकावरून ११ बंब पाठविण्यात आले. परंतु आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रणासाठी अग्निशमन जवानांना उशिरा रात्रीपर्यंत कसरत सुरू होती. आगीमुळे इमारत कोसळली, सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

जुना कामठी रोड, कळमना मार्केटच्या मागे रेल्वेस्थानाकाच्या पुढील भागात पाच माळ्यांचे गोदाम आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास या गोदामाला आग लागली. क्षणातच आगीने लोळ पसरल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. साडेतीनच्या सुमारास अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली.

आग विझविण्यासाठी तत्काळ ४ अग्निशमन बंबांना घटनास्थळी पाठविण्यात आले. दिवसभर कर्मचाऱ्यांची आगीवर नियंत्रण मिळविण्याची धावाधाव सुरूच होती. सायंकाळपर्यंत ११ बंबांची घटनास्थळी सतत ये-जा सुरूच होती. आगीचे कारण अज्ञात असून आग लावण्यात आली की लागली, याबाबत संभ्रम आहे. वास्तविक, पूर्वी या इमारतीमध्ये कोल्ड स्टोरेज होते.

इमारतीच्या मालकाने अग्निशमन विभागाचा परवाना घेतला होता. वर्ष २०१५ मध्ये ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. इमारत रिकामी करण्याचे विभागाने सांगितले होते. त्यानंतर, इमारत मालकाने कोल्ड स्टोरेज बंद करून इमारत विक्रीस काढली. ज्यांनी ही इमारत घेतली त्यांनी धान्याचे गोदाम म्हणून इमारतीचा वापर सुरू केला. इमारत मालकाने अग्निशमन विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसून परिपूर्णता प्रमाणपत्रदेखील घेतले नव्हते. त्यामुळे, महापालिकेकडे इमारतीच्या वापरासंदर्भात माहिती नव्हती. आगीच्या घटनेनंतर इमारत मालकांची उदासीनता उघडकीस आली. 

इमारत कोसळली
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने वर्ष २०१५ मध्येच इमारत धोकादायक असून ती रिकामी करण्याचे इमारत मालकास बजावले होते. त्याकडे दुर्लक्ष करत इमारत विक्रीस काढली. ज्यांनी घेतली त्यांनी विना परवाना इमारतीमध्ये धान्याचे गोदाम तयार केले. आगीच्या घटनेमुळे अग्निशमन जवानांना इमारत कोसळणार असल्याचा अंदाज आला. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या भोवतालचा परिसर रिकामा केला. दरम्यान, इमारत कोसळली. 

टीटीएलचा पहिल्यादाच वापर
डिसेंबर २०१६ मध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागात अत्याधुनिक टर्नर टेबल लॅडर (टीटीएल) मशीन खरेदी केली. तेव्हापासून टीटीएलचा वापर झाला नव्हता. आज या आगीच्या ठिकाणी पहिल्यांदाच टीटीएल तैनात करण्यात आली. टीटीएलने ४२ मीटर उंच इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविता येते. टीटीएलच्या साहाय्याने इमारतीवर पाण्याचा मारा करण्यात आला.  

गोदामाला अग्निशमनची ‘एनओसी’ नाही 
काही वर्षांपूर्वी एका कोल्डस्टोरेजला लागलेल्या आगीनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नाहरकत प्रमाणपत्राशिवाय गोदामांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मनुष्यबळाअभावी अग्निशमन विभागाला प्रत्येकाकडे जाणे शक्‍य नाही. त्यामुळे गोदाम मालकांनी नाहरकत प्रमाणपत्र स्वतःहून घेणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक गोदाम मालकांनी अग्निशमन विभागाकडे दुर्लक्ष केले. या गोदामालाही ‘एनओसी’ नसल्याचे पुढे आले आहे. 

महापौरांचे नोटीस बजावण्याचे निर्देश 
महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली. यासंदर्भात अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता धान्यसाठा कसा करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामधील दोषींना नोटीस द्या असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक लहूकुमार बेहते, राजकुमार साहू, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, बी. पी. चंदनखेडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com