महामेट्रो सुरू करणार दशकांपासूनचा बंद रस्ता 

महामेट्रो सुरू करणार दशकांपासूनचा बंद रस्ता 

नागपूर - वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेच्‍या डबल डेकर पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याने वाहतुकीच्या कोंडीने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी महामेट्रोने गेली अनेक दशके बंद असलेला जुना विमानतळ रोड पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली. जुना विमानतळ रोड खामला मार्गाशी जोडण्यात येत आहे. डबल डेकर पुलाच्या कामामुळे वर्धा मार्ग एका बाजूने बंद करण्याची शक्‍यता असून नागरिक, वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. 

ब्रिटिश काळात विमानतळावर पोहोचण्यासाठी ९०० मीटर लांबीचा जुना मार्ग होता. वर्धा मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर हा मार्ग बंद झाला होता. विमानतळ ते वर्धा रोडला हा रस्ता जोडला होता. गेली अनेक दशके हा रस्ता बंद होता. डबल डेकर पुलाच्या कामासाठी वर्धा रोडवरील वाहतूक कुठून वळवावी, असा प्रश्‍न महामेट्रोपुढे उभा ठाकला होता. जुना विमानतळ मार्ग पुन्हा सुरू करण्याबाबत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेतल्या. एमएडीसीने महामेट्रोला सहकार्य करीत गेली अनेक वर्षे  बंद सहकारनगर घाटाजवळील द्वार सुरू केले. जुना विमानतळ मार्गाची सध्याची रुंदी साडेतीन मीटर असून महामेट्रोने साडेपाच ते सहा मीटरपर्यंत वाढविण्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर या रस्त्यांच्या डांबरीकरणालाही प्रारंभ करण्यात आला. मात्र, या रस्त्यावर फ्लाईंग क्‍लब असून विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कुठल्या वाहनांना, नागरिकांना  येथून ये-जा करण्यास परवानगी राहील, याबाबत अद्याप स्पष्ट नाही. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे एमएडीसीच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले. 

वर्धा रोडवरील डबल डेकर पूल उभारण्यासाठी रस्त्यांवर मोठ्या क्रेन इतर मशीन उभ्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे वर्धा मार्गावरील एका बाजूची वाहतूक सहा ते आठ महिने बंद करावी लागणार आहे. ही एका बाजूची वाहतूक जुन्या विमानतळ मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे महामेट्रोतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नमूद केले. मात्र, यासाठी एमएडीसीची परवानगी आवश्‍यक असल्याची पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली. 

व्हीव्हीआयपींसाठी सुविधा? 
डबल डेकल पूल तयार झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक पूर्वीप्रमाणे वर्धा रोडवरून सुरू होईल. अशावेळी जुन्या विमानतळ मार्गाचा वापर व्हीव्हीआयपींसाठी होण्याची शक्‍यता आहे. 
या मार्गाने विमानतळावरून व्हीव्हीआयपींना थेट शहरात प्रवेश करता येईल. परंतु, याबाबतचा अंतिम निर्णयही मेट्रो रेल्वेचे संपूर्ण काम संपुष्टात आल्यानंतरच घेण्यात येईल, असे एमएडीसीच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले. 

डबल डेकल पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. या कामासाठी वर्धा  मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या विमानतळ मार्गाचा वापर पर्याय म्हणून स्वीकारण्यात येत आहे. या रस्त्याची डांबरीकरण, रुंदीकरणाची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 
- अनिल कोकाटे,  महाव्यवस्थापक, महामेट्रो. 

‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांची गैरसोय 
जुन्या विमानतळ मार्गावर सहकारनगर, सोनेगाव, खामला, पांडे ले-आउट, जयप्रकाशनगरातील अनेक नागरिक सकाळ व सायंकाळी फिरण्यास जातात. मात्र, आता या रस्त्याचे काम सुरू झाल्याने त्यांच्या नित्यनेमात अडथळा निर्माण झाला. सुरक्षेच्या कारणावरून या रस्त्यांवरून नागरिकांना फिरण्यास मनाई करण्यात आली होती. आता येथून वाहतूक सुरू करण्यात येत असल्याबाबत काही नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com