रुग्णांसाठी नव्हे; टेबलखुर्च्यांसाठी उघडतो गेट

Medical-Hospital
Medical-Hospital

नागपूर - पाच मिनिटांपूर्वी हॉस्पिटलमध्ये पोहोचले असते, तर जीव वाचण्याची शक्‍यता होती, असे डॉक्‍टरांचे बोल नेहमीच ऐकायला मिळतात. तरीदेखील रुग्णवाहिकेतून आणलेल्या रुग्णासाठी मेडिकलला जोडणारे सुपरचे प्रवेशद्वार उघडले जात नाही. मात्र, मेडिकलमधून टेबल खुर्च्यांनी भरलेल्या ‘ट्रक’साठी प्रवेशद्वार उघडण्यात येते. हा अफलातून प्रकार मंगळवारी सुपर स्पेशालिटीच्या प्रवेशद्वारावर पुढे आला.

मंगळवारी दुपारी मेडिकलमधून रुग्णाला सुपरमध्ये रेफर केले. रुग्णाला रुग्णवाहिकेतून सुपरच्याअंतर्गत प्रवेशद्वारापर्यंत आणले. परंतु, प्रवेशद्वार बंद होते. सुरक्षारक्षक दुरून बघत होता. तो प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलाच नाही. मेडिकल चौकातून वळसा घालून रुग्णवाहिका सुपरमध्ये आली. रुग्णांसाठी मेडिकल आणि सुपर आहे. परंतु, त्यांच्याच जीवाची किंमत प्रशासनाला नसल्याचे या घटनेवरून पुढे आले.

अवघ्या काही वेळानंतर टेबल खुर्च्यांनी भरलेला ट्रक याच प्रवेशद्वारावर येऊन थांबला. सुरक्षारक्षक किल्ली घेऊन प्रवेशद्वाराजवळ पोहोचले व द्वार उघडले. टेबलखुर्च्या सुपरमध्ये उतरविल्या. यानंतर रिकामा ट्रक मेडिकलच्या दिशेने निघाला. सुरक्षारक्षक पुन्हा धावत  प्रवेशद्वारावर पोहोचला व गेट उघडले. प्रवेशद्वार उघडले जात नसल्याने मेडिकलमधून रेफर  केल्या जाणाऱ्या रुग्णांना फटका सोसावा लागतो. दीड वर्षांपासून हे प्रवेशद्वार बंद आहे.

प्रवेशद्वार बंद करण्याचे कारण
मेडिकलमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या वसतिगृहासमोर अश्‍लील चाळे करताना तरुणाला पोलिसांनी हिसका दाखविला. मुलींच्या सुरक्षेचे कारण देऊन मेडिकल प्रशासनाने मेडिकलला सुपरशी जोडणाऱ्या गेटलाच कुलूप ठोकले. अपवाद वगळता हे गेट उघडले जात नसल्याचा दावा प्रशासन करते. सुरक्षेच्या नावावर मेडिकल व सुपर स्पेशालिटीत रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. अडीच वाजता प्रवेशद्वार बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही या प्रवेशद्वारातून प्रवेश नाही.

अधिष्ठाता पोहोचले वळसा घालून
सुपर स्पेशालिटीत मंगळवारी दुपारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य अभियानाची बैठक घेतली. मेडिकलमधून सुपरमध्ये बैठकीसाठी अधिष्ठाता निघाले. अधिष्ठातांनी वंजारीनगरच्या दिशेने कार घेतली. वंजारीनगर, अजनी पोलिस ठाणे असा वळसा घालून डॉ. निसवाडे सुपरमध्ये पोहोचले. अधिष्ठाता नियम पाळतात, मात्र टेबलखुर्च्यासाठी ट्रकवाल्यांना सोडून सुरक्षारक्षक नियम तोडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com