पेट्रोल-डिझेल भेसळीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Petrol
Petrol

नागपूर - शासकीय कंपनीच्या पेट्रोल टॅंकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी केल्यानंतर त्यात भेसळ करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर शनिवारी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने छापा घातला. छाप्यात दोन रिकामे टॅंकर व सहा इंधन भरलेले टॅंकर जप्त केले. तसेच ९ आरोपींना अटक केली.

पोलिस उपायुक्त भरणे यांना माहिती मिळताच कारवाईसाठी विविध पथके तयार केले. पथकाने पोलिस ठाणे नंदनवन अंतर्गत रिंग रोडवरील फोर लेन धाबा, तिरोडी रोड अतिक ठाकूर गोडाउन, वाठोडा येथील पटेल ट्रेडिंग कंपनीवर सापळा रचून धाडी टाकल्या. पोलिसांना येथे पेट्रोल, डिझेल व रॉकेलचे जवळपास १५ बॅरल आढळले. तसेच दोन खाली टॅंकर व सहा इंधन भरलेले टॅंकर जप्त केले.

तत्पूर्वी, पोलिसांनी आरोपींना इंधन ठेवण्याचा परवानासह उद्देशाचे कारण विचारले असता याबाबत ते कागदपत्र सादर करण्यास असमर्थ ठरले. ज्वलनशील पदार्थाचा अवैध साठा करून ठेवणे, त्यात भेसळ करून विक्री करणे, भेसळीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण करणे, तसेच ज्वलनशील पदार्थाचा साठा करून नागरिकांना धोका निर्माण होईल, असे कृत्य करणे आदी कारणांसाठी ९ जणांविरुद्ध कारवाई केली.

आरोपी हे रस्त्याने जाणाऱ्या शासकीय इंधन वाहून नेणाऱ्या टॅंकरचालकांशी संगणमत करून इंधनाची चोरी करायचे. नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध इंधन चोरीचा गुन्हा दाखल केला. भेसळ संबंधाने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यत येणार असल्याचे पोलिस माहिती कक्षाचे प्रमुख सुधाकर खजे यांनी सांगितले.

नंदनवन पोलिसांची भूमिका संशयास्पद
नंदनवन पोलिसांच्या आशीर्वादाने पेट्रोल-डिजेल भेसळीचा व्यवसाय फुलला होता. अनेक महिन्यांपासून हा व्यवसाय पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे सुरू होता. त्यामुळे थेट उपायुक्‍त भरणे यांना छापा घालावा लागला. या छाप्यानंतर नंदनवन पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com