वायगावच्या हळदीची बातच न्यारी!

Turmeric
Turmeric

समुद्रपूर (जि. वर्धा) - मुगल काळापासून परंपरागत पद्धतीने जपलेले वाण. इतर हळदींपेक्षा तिप्पट औषधी गुण. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने घेतलेले पीक आणि शासनाकडून भौगोलिक मानांकन प्राप्त वायगावच्या हळदीची बातच न्यारी आहे. कुठल्याही हळदीत वायगावच्या हळदीचे नाव पुरेसे असून या हळदीने वायगाव (हळद्या) गावाची ओळख देशपातळीवरच नव्हे, तर जगात पोहोचवली आहे.

वर्धा जिल्ह्यातील वायगाव (हळद्या) हे गाव हळद उत्पादनात अग्रेसर आहे. गावातील हळदीचे पीक ‘वायगावची हळद’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. समुद्रपूर तालुक्‍यात वायगावसह (हळद्या) नारायणपूर, नंदोरी, मंगरूळ, डोंगरगाव, पवनगाव, वासी, कोरा, समुद्रपूर, बेलघाट, मांडगाव, गिरड, मुरादपूर, खैरगाव इत्यादी गावांमध्ये १ हजार ३०० हेक्‍टरमध्ये वायगाव हळदीचे उत्पादन घेतले जाते. हळदीत औषधी गुण असलेल्या कुर्क्‍युमिनचे (CURCUMIN) प्रमाण सहा ते सात टक्‍के आहे. इतर हळदींमध्ये हेच प्रमाण दोन टक्‍क्‍यांपर्यंतच आढळते. या हळदीचा रंग इतरांच्या तुलनेत गडद पिवळा असून चवही वेगळी आहे. 

या हळदीत तेलाचे प्रमाण जास्त असून त्याचा गंधही चांगला आहे. खाद्यपदार्थात अगदी थोडी जरी हळद टाकली तरी पदार्थाचा रंग बदलतो. ही हळद आरोग्यदायी असून रोगप्रतिकारकक्षमता वाढविते. कर्करोग, मेंदूविकार, वातविकार, सर्दी, ताप, खोकला, त्वचाविकार इत्यादींवर ती हितकारक आहे. गेल्यावर्षी शासनाद्वारे या हळदीला भौगोलिक मानांकनसुद्धा मिळाले. 

वायगाव हळदीमध्ये जावळी, बामणी आणि भेंडी असे प्रकार आहेत. यातील जावळी प्रकारात सर्वाधिक औषधी गुण आहेत. मोगल काळात बादशहाने येथील शेतकऱ्यांना जमिनीचे ३०० पट्टे दिले व तेथूनच हळद उत्पादनाला चालना मिळाल्याचे गावकरी सांगतात. हळदीचे उत्पादन आजही परंपरागत पद्धतीने घेतले जाते. हळद उकळण्यासाठी आधुनिक साधने असतानाही तांब्यांच्या हंड्यांमध्ये हळद उकळली जाते. हळद काढण्यासाठी कुदळीचा वापर करतात. रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीवरच शेतकऱ्यांचा भर असतो. येथील हळदीचे वाण नष्ट होऊ नये, हीच यामागील भावना आहे. वायगावच्या हळदीचा दर्जा सर्वोत्तम असला तरी परिसरात मोठी बाजारपेठ नाही. राज्यातील अनेक व्यापारी गावातूनच हळद खरेदी करतात आणि देश-विदेशांत विकतात. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बचतगटाच्या माध्यमातून येथे महिलांनी कंपनी स्थापन करून हळदीवर प्रक्रिया उद्योग उभारला जात आहे. 

कृषी सहायक व नैसर्गिक शेतीतज्ज्ञ मनोज गायधने यांनी दिल्ली येथे झालेल्या जगभरातील १६३ देशांच्या जैविक विश्‍वकुंभामध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत वायगावच्या हळदीचे सादरीकरण केले होते. विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक संघाद्वारे येथील हळदीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यात संपूर्ण विदर्भासह मुंबई आणि पुण्यात वायगाव हळदीला मोठी मागणी आहे. मगन संग्रहालय समिती या सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांतूनच समुद्रपूर तालुका मसाले पीक उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली असून, या मंडळात येथील शंभर शेतकऱ्यांचा समावेश आहे. विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक किसान कंपनीच्या माध्यमातून हळदप्रक्रिया आणि मार्केटिंगची फळी उभारण्याचे कार्य सुरू आहे. बाजारपेठेचा तिढा सुटल्यास वायगावची हळद सातासमुद्रापार पोहोचू शकेल, हे मात्र निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com