आता घरबसल्या करा विवाह नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नागपूर - वधू-वर यांना नोटीस देण्यासाठी व विवाहासाठी विवाह अधिकाऱ्यांकडे जावे लागत होते. तसेच विवाह अधिकारी कार्यालयात माहिती भरण्यात बराच वेळ जात होता. आता नोटीससाठी ऑनलाइन प्रक्रिया बंधनकारक केल्याने घरबसल्या विवाहाची नोटीस देणे शक्‍य होणार आहे.

नागपूर - वधू-वर यांना नोटीस देण्यासाठी व विवाहासाठी विवाह अधिकाऱ्यांकडे जावे लागत होते. तसेच विवाह अधिकारी कार्यालयात माहिती भरण्यात बराच वेळ जात होता. आता नोटीससाठी ऑनलाइन प्रक्रिया बंधनकारक केल्याने घरबसल्या विवाहाची नोटीस देणे शक्‍य होणार आहे.

विवाह कायद्याअंतर्गत विवाहाच्या नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१७ पासून ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून दिली होती. विवाह निबंधक कार्यालयाच्या वतीने आता १ ऑगस्ट २०१८ पासून ही नोटीस ऑनलाइन पद्धतीने देणे बंधनकारक केले आहे. वधू-वरांना www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवरील लिंकवरून विवाहाची नोटीस द्यावी लागणार आहे.

विशेष विवाह कायदा १९५४ नुसार विवाहेच्छुक वधू-वरांना नियोजित विवाहाची नोटीस, वय, रहिवासीच्या पुराव्याच्या कागदपत्रांसह जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे शुल्कासह सादर करावे लागते. वधू-वर अटींची पूर्तता करीत असल्यास ही नोटीस स्वीकारून विवाह अधिकारी ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करतात. दोघांपैकी एकजण इतर जिल्ह्यातील असल्यास या नोटीसची प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे पाठविले जाते. ही नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत आक्षेप न आल्यास कायदेशीर पद्धतीने विवाह करता येतो. जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक हे विवाह अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सरकारने विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचेही संगणकीकरण केले आहे. यासाठी राज्यातील विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडली आहेत.

ऑनलाइन प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर जोडप्यांना संगणकीय प्रणालीद्वारे नोटीस क्रमांक व नोटीस दिल्यापासून ३० दिवसांनंतर आणि ६० दिवसांच्या अगोदर विवाहासाठी येण्याची तारीख एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. अर्ज भरताना वधू-वर यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वधू-वर यांच्या वयाचा, ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा, तीन साक्षीदारांच्या ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा आवश्‍यक आहे. तसेच ऑनलाइन नोटीस अर्ज भरण्यापूर्वी संगणकाला वेब कॅमेरा व थम्ब स्कॅनर असणेही गरजेचे आहे. जेणे करून वधू-वर यांचा फोटो घेणे व डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करणे शक्‍य होईल. ऑनलाइन विवाह नोंदणीचे शुल्कदेखील ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: marriage registration in home