महापौरांनी विदेश दौऱ्यासाठी मुलाला दाखविले खासगी सचिव

Nanda-Jichkar-and-Priyansh
Nanda-Jichkar-and-Priyansh

नागपूर - गेल्या अकरा महिन्यात सहाव्या विदेश दौऱ्याने महापौर नंदा जिचकार अडचणीत आल्या आहेत. हवामान व उर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेसाठी त्या सॅन फ्रॅन्सिस्को येथे गेल्या असून या दौऱ्यात त्यांनी मुलगा प्रियांशला खाजगी सचिव म्हणून दाखविले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत शहर भाजपने दिले आहे. 

महापौर नंदा जिचकार यांना ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर फॉर क्‍लायमेट ॲन्ड एनर्जी या संस्थेने हवामान व उर्जा बदलावर आधारित जागतिक परिषदेसाठी आमंत्रित केले. ही परिषद सॅन फ्रान्सिस्को येथे १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली. या परिषदेसाठी जिचकार ११ सप्टेंबरला रवाना झाल्या. मात्र, त्यांनी सोबत मुलगा प्रियांशला खाजगी सचिव म्हणून पुढे करीत दौऱ्यावर नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. महापालिकेत त्यांना सचिव असताना त्यांनी मुलाला खाजगी सचिव म्हणून का पुढे केले? असा प्रश्‍न आता चर्चिला जात आहे. महापौरांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर फॉर क्‍लायमेट ॲन्ड एनर्जी ही संस्था करीत आहेत. त्यांच्या मुलाच्या व्हिसाचा मार्गही  या संस्थेने यूएस दुतावासाकडून मोकळा केला. या संस्थेने यूएस दूतावासाला दिलेल्या पत्रात प्रियांशचा उल्लेख नागपूर महापौरांचे खाजगी सचिव असा आहे. 

महापौरांकडून पदाचा गैरवापर करून मुलाच्या पर्यटनासाठी प्रयत्न केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौरांना ही बाब अशोभनीय आहे, असे नमुद केले. महापौरांच्या या कृतीमुळे सत्ताधारी पक्षही अडचणीत आला असून सावरासावर सुरू झाली आहे. 

महापौर नंदा जिचकार यांना ज्या संस्थेने आमंत्रित केले, त्याच संस्थेने एकाला सोबत घेण्याचा पर्याय दिला होता. या दौऱ्यावर महापालिकेने कुठलाही खर्च केला नाही. मात्र, झाल्या प्रकाराबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल. 
- संदीप जोशी, सत्तापक्ष नेते, महापालिका. 

महापौर नंदा जिचकार यांच्यासोबत बोलणे झाले. दौऱ्यानंतर सर्व घटनाक्रम त्या स्पष्ट करणार आहेत. त्यात काही चुकीचे असेल तर त्यांना पक्षातर्फे समज देण्यात येईल. 
- आमदार सुधाकर कोहळे, शहर भाजपाध्यक्ष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com