मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली नशामुक्‍त भारत निर्माण रॅली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

संपूर्ण दारूबंदीसाठी देशभर हे आंदोलन केले जाणार आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

नागपूर : 'नशामुक्त भारत आंदोलना'च्या वतीने आज (बुधवार) नागपूरच्या दीक्षाभूमी येथून नशामुक्‍त भारत निर्माण रॅली काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. 

राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने आलेले नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. देशात 10 लाख नागरिकांचा मृत्यू दारू पिण्यामुळे होतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकार दारूविक्रीला परवानगी देते. दारूमुळे होणारे कौटुंबिक आणि सामाजिक दुष्परिणाम लक्षात घेता नशामुक्त भारत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण दारूबंदीसाठी देशभर हे आंदोलन केले जाणार आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

'महाराष्ट्रात दारूबंदी लागू करा'
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांसंबंधी घोषणा देत लक्ष वेधून घेतले. 'संविधानातील कलम 47 नुसार दारूबंदी लागू करा', 'महाराष्ट्रात दारूबंदी लागू करा', 'आम्ही लढणार, आम्ही जिंकणार', 'जगा आणि जगू द्या', 'गांजा, चरस, गर्द, दारू, उपचार सावरेल तुमचे तारू', 'नशेची आस... जीवनाला फास', 'दारू नको, पाणी पाहिजे', 'घेऊ नको गर्द, होशील नामर्द' अशा हिंदी आणि मराठीतील विविध घोषणांचे फलक घेऊन लोक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.