देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मेहकर - नांदेड जिल्ह्यातील उमरी रेल्वे येथील भाविक हे देवदर्शनासाठी तीन दिवसांपूर्वी निघाले होते. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील जाळीचा देव, सैलानी येथील दर्शन घेऊन ते परतीच्या मार्गावर असताना मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम गावाजवळ त्यांच्या वाहनाला आज अपघात होऊन त्यात तिघांचा जागीच मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले. गाडीमध्ये एकूण 11 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.

भरधाव बुलडाण्याकडून मेहकर मार्गे नांदेडकडे परतीचा प्रवास करताना क्रुझर गाडी क्रमांक एमएच 26 एके 4837 गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने हिवरा आश्रमपासून अवघ्या काही अंतरावर सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास गाडी तब्बल चार ते पाच वेळा उलटली. या वेळी मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांसह हिवरा आश्रम तसेच ब्रह्मपुरी येथील ग्रामस्थांनी जखमींना तत्काळ उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात अर्चना कदम (वय 36), श्रुती नवले (वय 10), दशरथ गव्हाणे (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला तर, अद्वैत कदम (वय 6), किंचन गव्हाणे (वय 11) आदिती गव्हाणे (वय 20), नितीन कदम (वय 20), मीराबाई काळे (वय 50) हे गंभीर जखमी झाले आहे. या व्यतिरिक्‍त चौघे किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर चालक पळून गेला.

Web Title: mehkar vidarbha news 3 death in accident