चौथ्या माळ्यावरून मेट्रो रेल्वेवर नियंत्रण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वेच्या इंटरचेंज स्टेशनच्या कामाला मुंजे चौकात प्रारंभ झाला असून, एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली. मेट्रो रेल्वेचे हे स्टेशन नागपूरचे आकर्षण वाढविणार असून, दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. या स्टेशनच्या चौथ्या माळ्यावरून मेट्रो रेल्वेच्या तांत्रिक घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे. 

नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वेच्या इंटरचेंज स्टेशनच्या कामाला मुंजे चौकात प्रारंभ झाला असून, एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली. मेट्रो रेल्वेचे हे स्टेशन नागपूरचे आकर्षण वाढविणार असून, दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. या स्टेशनच्या चौथ्या माळ्यावरून मेट्रो रेल्वेच्या तांत्रिक घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे. 

मुंजे चौकातून आनंद टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर सुरक्षेसाठी बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मुंजे चौकापासून आनंद टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर दोन मीटर जागा सोडून नव्याने बॅरिकेड्‌स लावण्यात येणार असल्याने काही प्रमाणात व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोच्या कामासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) प्रकल्प संचालक महेश कुमार यांनी केले आहे. इंटरचेंजच्या कामामुळे सीताबर्डीत माहिती आणि मदत केंद्र स्थापन करण्यात येणार असून टोल फ्री क्रमांकावरून लोकांना तक्रार करता येणार आहे. इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे कंत्राट हैदराबाद येथील आयएल ऍण्ड एफएस इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला देण्यात आले आहे. इंटरचेंज मेट्रो स्टेशन (आयकॉनिक टॉवर) L आकाराचे राहणार असून पहिल्या माळ्यावर (कॉन्कोर्स) मेट्रोचे तिकीट मिळेल. दुसऱ्या माळ्यावर पूर्व-पश्‍चिम तर तिसऱ्या माळ्यावर उत्तर-दक्षिण कॉरिडोरसाठी प्लॅटफॉर्म आणि चौथ्या माळ्यावर नियंत्रण केंद्र (ओसीसी) कार्यरत राहील. येथून दोन्ही मेट्रो मार्गावरील मेट्रो रेल्वेचे परिचालन, सिग्नल, वीज, एस्केलेटर, सीसीटीव्ही आदी तांत्रिक बाबींवर नजर ठेवण्यात येणार आहे. 

झिरो माईल्स स्टेशनचे 15 मजले स्टीलचे 
झिरो माईल्स येथील मेट्रो स्टेशनची प्रस्तावित इमारत 20 माळ्यांची राहणार आहे. सध्या पाच माळ्यांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित 15 माळे स्टीलचे राहणार आहे. त्यामुळे ही इमारत शहरातील आकर्षणाचे वेगळे केंद्र ठरण्याची शक्‍यता आहे. पाचव्या माळ्यावर प्लॅटफॉर्म राहणार आहे. 

यंदा 2700 कोटींची गरज 
शहरातील मेट्रो प्रकल्प 8,680 कोटींचा आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत या प्रकल्पात आतापर्यंत 1550 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यात मनपा आणि नासुप्रकडून हस्तांतरित जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. तर यंदा मनीषनगर उड्डाणपूल, बर्डी इंटरचेंज स्टेशनची कामे बघता 2700 कोटींची गरज भासणार आहे. 

टॅग्स