मेट्रो रेल्वे "डबल डेकर पूल' चौपदरी

मेट्रो रेल्वे "डबल डेकर पूल' चौपदरी

नागपूर - अजनी ते हॉटेल प्राईडनजीकपर्यंत प्रस्तावित मेट्रो रेल्वेच्या डबल डेकर पूल चौपदरी राहणार असून, डिसेंबरपासून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होईल. याच पुलाला मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूलही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना राहणार असून, मनीषनगर व त्या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून वाहतुकीची समस्या निकाली निघणार असल्याचे नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी सांगितले.

मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर अजनी ते प्राईड हॉटेलपर्यंत 3.2 किमीचा लांबीचा डबल डेकर पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी छत्रपती चौकातील उड्डाणपूल पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वांत वरच्या मजल्यावरून मेट्रो रेल्वे धावणार असून त्याखालील मजल्यावरून चारचाकी वाहने, अशी पुलाची रचना राहणार आहे. छत्रपती चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. लगेच डबल डेकर पुलाच्या कामाची प्रक्रिया सुरू होऊन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग ते वर्धा रोडपर्यंत यापूर्वी कमी लांबीमुळे उड्डाणपूल शक्‍य नव्हता. परंतु, आता मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डबर डेकर पुलाला जोडण्यात येणार आहे. या उड्डाणपुलावरून डबल डेकर पुलावर येताना तसेच मनीषनगरकडून बर्डीकडे व वर्ध्याकडून येताना मनीषनगरकडे वळण घेण्यासाठी विशेष रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे नमूद करीत त्यांनी यामुळे अपघाताची शक्‍यता राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनीषनगरचा उड्डाणपूल 900 मीटर लांबीचा असून मेट्रो रेल्वे व रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीच्या आधारावर रेल्वेकडे जागेबाबत तसेच डिझाईनचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचेही दिक्षित म्हणाले.

खासगी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू
या प्रकल्पासाठी 82 टक्के जागेचे अधिग्रहण करण्यात आले. यात शासकीय जमिनीचा समावेश आहे. खासगी जमिनीचे अधिग्रहण फारच अल्पप्रमाणात करावे लागणार आहे. नव्या जमीन अधिग्रहण कायद्याप्रमाणे बाजारभावापेक्षा जास्त मोबदला जमीन मालकांना दिला जाईल. नागरिकांचीही सहमती असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रक्रिया केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगणा मार्गावर कामाला लवकरच प्रारंभ
हिंगणा मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. अंबाझरी रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन झाले असून, या परिसरासह एलएडी चौकात बॅरिकेड्‌स लावण्यात येत आहे. या मार्गावरील व्हायडक्‍ट तयार करण्याचे काम 15 ते 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. काही भागात हिंगणा रोड अरुंद आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी फुटपाथ तोडून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.

फ्रान्सकडून लवकरच एक हजार कोटी
जर्मनीकडून 3,750 कोटींचे कर्ज मंजूर झाले असून, पहिला हफ्ता पुढील आठवड्यात मिळण्याची शक्‍यता आहे. याशिवाय फ्रान्सकडून एक हजार कोटींचे कर्ज लवकरच उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com