‘मिल्क बूथ’साठी मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्राला झुकते माप

Milk-Booth
Milk-Booth

नागपूर - शहरात ३० मिल्क बूथसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता नासुप्रने नियम शिथिल करण्याचा निर्णय घेत राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. सरकारने  नियम शिथिल करण्यास मान्यता दिली असून नासुप्रने निश्‍चित केलेल्या सर्वाधिक जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रातील आहेत. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मिल्क बूथचा प्रस्ताव असून सर्वाधिक बेरोजगार मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रातच आहे काय? असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. 

नागपूर सुधार प्रन्यास विश्‍वस्त मंडळाने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मिल्क बूथसाठी शहरातील ३० जागा कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाला भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यासाठी राज्य शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. या जागा देण्यासंदर्भात नासुप्रने जमीन विनियोग नियम शिथिल करण्यासाठीही मंजुरी सरकारकडे मागितली होती. १० सप्टेंबरला सरकारने नासुप्रच्या नियम व अटी शिथिल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.  त्यानुसार आता शहराच्या विविध भागात ९६ ते २५० वर्गफूट जागा मिल्क बूथसाठी देण्यात  येणार आहे.

शहरातील दिव्यांग, महिला, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना या जागा देण्यात येणार आहे. नासुप्रने मिल्क बूथकरिता देण्यासाठी निवडलेल्या जागांपैकी सर्वाधिक १४ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदार क्षेत्रातील आहेत. यात सोमलवाडा, परसोडी, अजनी, खामला, बाबूळखेडा येथील जागांचा समावेश आहे. सोमलवाड्यात ४, बाबूळखेड्यात ५, खामल्यात २, परसोडी व अजनी येथे प्रत्येकी एक जागा मिल्क बूथसाठी निश्‍चित करण्यात आली आहे. या जागा कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाला सोपविण्यापूर्वी जागेच्या वापरांबाबत खात्री करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने नासुप्र सभापतींना दिले आहे.

वर्षाला १ रुपया भाड्याने जागा 
मिल्क बूथसाठी ९६ ते २५० वर्गफूट जागा देण्यात येणार आहे. अर्थात संपूर्ण शहरात २ हजार  ते ८ हजार वर्गफूट क्षेत्रफळात ३० मिल्क बूथ तयार होणार आहेत. १ रुपया प्रतिवर्ष भाड्यावर या जागा देण्यात येणार आहेत. या मिल्क बूथचा लाभ सामान्य बेरोजगारांना किती होणार, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

२१ हजार वर्गफुटांची जागा संस्थेला
नासुप्रने यापूर्वी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानला भामटी परसोडी व स्वावलंबीनगरात २१ हजार वर्गफूट जागा दिली. ही जागा देण्यासाठीही नासुप्रने नियम शिथिल केले. ही जागा व्हेटरनरी हॉस्पिटलसाठी आरक्षित आहे. या जागेवर ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान व्हेटरनरी हॉस्पिटल, गोसेवा केंद्र, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण वर्ग चालविणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com