मोबाईलच्या प्रकाशात रचले सरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

हिंगणा - जिवंतपणी मूलभूत सुविधा पुरवू न शकणारी वानाडोंगरी ग्रामपंचायत जगाचा निरोप घेणाऱ्यांनाही अखेरच्या क्षणी यातना देत आहेत. याचा अनुभव रविवारी वानाडोंगरी स्मशानभूमीत आला. मुखाग्नी देण्याच्या शेडजवळ वीज दिव्‍यांची व्यवस्था नसल्यामुळे मोबाईलच्या प्रकाशात सरण रचून अंत्यविधी आटोपण्यात आली.

मारोती दगडू क्षीरसागर (७८, रा. ट्रॅंक्‍टर कंपनी चौक, वानाडोंगरी) यांचे मेडिकलमध्ये निधन झाले.  रात्री आठ वाजून ३५ मिनिटांनी मारोती क्षीरसागर यांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणण्यात आले. मात्र, मुखाग्नी देण्याच्या शेडजवळील वीज दिवे बंद असल्याने काळोख पसरला होता. शेवटी नातेवाईक व मित्रमंडळींनी मोबाईल प्रकाशात सरण रचून  अंत्यविधी पार पडली. रात्रीच्या वेळी अनेकदा अंत्यविधी करण्याचा प्रसंग येतो. अशावेळी बंद वीज दिव्‍यांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. वानाडोंगरी ग्रामपंचायतीतील सुस्त ग्रामसचिव व पदाधिकाऱ्यांना आता तरी जाग येईल का, असा प्रश्‍न यानिमित्त उभा ठाकला आहे.

वीज दिवा बंद

वानाडोंगरी ग्रामपंचायतने संगम रोडवर प्रशस्त स्मशानभूमी निर्माण केली. येथे भव्य शंकराची मूर्ती व आकर्षक प्रवेशद्वार तयार केले आहे.  येथे तीन वीज दिवे असून, एक बंद आहे. त्‍यामुळे नागरिकांना त्रास होत असतो.