मोहन भागवत यांना डॉक्टरेट पदवी बहाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

माफसू दीक्षांत समारंभ : अश्‍विनी चाफलेला सर्वाधिक सुवर्ण पदके 

पूर्वी पशूवैद्यक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. आता मात्र महत्त्व वाढले असून देश आणि राष्ट्राच्या विकासात या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

- मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डॉक्‍टर ऑफ सायन्स (डीएससी) पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते बहाल करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय कृषी अनुसंधान व कृषी संशोधन, शिक्षण विभागाचे महासंचालक डॉ.त्रिलोचन मोहपात्रा, कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा उपस्थित होते. 

पशुवैद्यक शास्त्राचे महत्त्व वाढले : मोहन भागवत 
मोहन भागवत म्हणाले, माफसू विद्यापीठात मी चार वर्षे शिक्षण घेतले. या चार वर्षांत जीवनाचे गणित आणि पशू पक्षांच्या सेवेचे बहुमूल्य शिक्षण मिळाले. पूर्वी पशुवैद्यक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. आता मात्र महत्त्व वाढले असून देश आणि राष्ट्राच्या विकासात या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुवैद्यक क्षेत्रात नवीन संशोधन करुन पशुधन टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.