शिकवायला प्राध्यापकच नाही!

Monsoon-Session
Monsoon-Session

यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १८ प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची बदली जानेवारी व जून महिन्यात झाली. त्यापैकी दहा डॉक्‍टरांना कार्यमुक्तही करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे रिक्त झालेल्या जागा आजही रिक्तच आहेत. या ‘मेगा बदली’मुळे वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी व एमएस हे पदव्युत्तर अभ्यासक्रम धोक्‍यात आले आहेत.

शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज एक हजार ८०० ते दोन हजार रुग्णांची तपासणी होत आहे. तर, भरती रुग्णांची संख्या सुमारे ७५० आहे. काही वर्षांपासून सुरू असलेल्या डॉक्‍टरांच्या मनमानी कारभाराला अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या भूमिकेमुळे चाप बसला आहे. त्यामुळे आठ महिन्यांत सुधारणा दिसत आहे. मात्र,  जानेवारी महिन्यात औषधशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, क्षयरोगशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र या विभागांतील प्राध्यापकांची बदली गोंदिया, जळगाव व चंद्रपूर येथे झाली.

त्यांना त्वरित कार्यमुक्तही करण्यात आले. त्यांच्या जागी प्राध्यापकांची नियुक्ती होण्यापूर्वीच जून महिन्यातच औषधवैद्यकशास्त्र, सामाजिक औषधशास्त्र, बालरोगशास्त्र विभागाचे सहायक  प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्राचे प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, जीवरसायनशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र या विभागांतील सहयोगी प्राध्याकांची बदली धुळे, अकोला, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, नांदेड येथे करण्यात  आली.

याही डॉक्‍टरांना कार्यमुक्त केल्यास रुग्णालय पूर्णत: ‘अपंग’ होण्याची भीती आहे. शासकीय रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४३ जागा आहेत. मात्र, प्राध्यापकांची अधिक पदे रिक्त झाल्याने औषधीशास्त्र, प्रसूती, बालरोग, सर्जरी आदी विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम धोक्‍यात आले आहेत.

रुजू होण्याबाबत उदासीनता
बदली झालेल्या १८ डॉक्‍टरांपैकी जळगावला बदलून गेलेल्या औषधवैद्यकशास्त्रच्या केवळ एका प्राध्यापकाची बदली रद्द करण्यात यश मिळाले आहे. जीवरसायनशास्त्र विभागात नागपूर येथून एका सहयोगी प्राध्यापकाची यवतमाळात बदली करण्यात आली. मात्र, त्यांनीही येथे रुजू होण्याबाबत उदासीनता दाखविल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com