मुंबईप्रमाणे नागपूर महापालिकेला निधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - जकात बंद झाल्यानंतर मुंबईला मिळालेल्या निधीप्रमाणे नागपूर महापालिकेला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज नागपूरच्या महापौर नंदा जिचकार व स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी भेट घेऊन केली. राज्यात "जीएसटी' लागू झाल्याने नागपूर महापालिकेला राज्य सरकारकडून वर्षाला केवळ 509 कोटी रुपये मिळणार आहेत. नागपूर महापालिकेचे जकातीचे उत्पन्न यापेक्षा कितीतरी अधिक असताना महापालिकेला मिळणारी रक्कम फारच तोकडी असल्याचे महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या निधीचे निकष उपराजधानीला लागू करावेत. तसेच उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार नागपूरला 1067 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नागपूर महापालिकेच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.