रस्ते विकास स्पर्धेचा महानगरपालिकेला पडला विसर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

प्रस्ताव तर मागविले; परंतु अद्याप निकालाचा पत्ता नाही

नागपूर - महापालिकेतर्फे शहरातील ठराविक पाच रस्त्यांच्या विकास कसा करता यासाठी तज्ज्ञांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी रस्तेविकास स्पर्धेची घोषणादेखील करण्यात आली. परंतु, आरंभशूर असलेल्या पालिकेला स्वत:च्याच स्पर्धेचा विसर पडल्याने मागविलेल्या प्रस्तावांचा निकाल लागलेला नाही. परिणामत: रस्त्यांचा विकास रखडला असून, पालिका अपघातमुक्त रस्त्यांसाठी खरेच गंभीर आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पालिकेले व्हेरायटी चौक, पागलखाना चौक, उंटखाना चौक, संविधान चौक आणि कडबी चौकाच्या विकासासंबंधी वास्तुविशारद तसेच संबंधित तज्ज्ञांकडून सूचना व प्रस्तावांची स्पर्धा आयोजित केली होती. याबाबतची घोषणा २ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आली. स्पर्धेतील नियमानुसार सूचनांच्या अंमलबजावणीसाठी खर्चाची मर्यादा ५० लाख रुपये निर्धारित करण्यात आली होती. तसेच प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २० जानेवारी २०१७ पर्यंत होती. महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार शहरातील तज्ज्ञ, संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सूचना व प्रस्ताव पाठविले. पालिकेच्या या घोषणेला भरघोस प्रतिसाद मिळाला. रस्त्यांचा विकास तसेच अपघातमुक्त चौक करण्यासाठी अत्यंत माफक खर्चामध्ये करण्याजोग्या विविध सूचना पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. परंतु, या सूचना धूळखात पडल्याने रस्त्यांचा विकास ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. सध्या शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर तत्काळ उपाययोजना शोधण्याची गरज असताना पालिका प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. 

महापालिकेने ठरविलेल्या पाच चौकांचीच नव्हे, तर शहारातील सर्व चौकांचा योग्य तो विकास होण्याची गरज आहे. प्रत्येक चौकात एक तरी लहान-मोठा अपघात दिवसाकाठी होत असल्याची नोंद आहे. यापैकी बरेचसे अपघात जीवघेणे असतात. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असला तरी उपक्रमाची सांगतादेखील होणे आवश्‍यक असल्याची भावना स्पर्धेत सहभागी झालेल्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे. 

या स्पर्धेचा निकाल तत्काळ लावण्यात येऊन चौकांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांना जनआक्रोशतर्फे निवेदनदेखील देण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय!

शहरातील वाहतूक सुरक्षेसंबंधी आमची संस्था कार्यरत आहे. शहरात कमीत-कमी अपघात व्हावे यासाठी संस्था नागरिकांचे प्रबोधन करते. यातलाच एक टप्पा म्हणजे पालिकेने घेतलेली स्पर्धा होय. स्पर्धेचा निकाल लागल्यास पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने अपघातमुक्त चौक करता येईल. 
- रवींद्र कासखेडीकर, सचिव, जनआक्रोश