मनपा आरोग्य केंद्रांना संजीवनी

Municipal-Health-Center
Municipal-Health-Center

नागपूर - मनपाच्या आरोग्य केंद्रांकडे बघून नाकं मुरडणारी पावले आता पुन्हा या  केंद्रांकडे परतताना दिसत आहेत. टाटा ट्रस्टच्या सहकार्याची ही किमया असून, अत्याधुनिक डिजिटलाईज्ड आरोग्यसेवेकडे महापालिकेने आगेकूच केल्याचे सध्या पहिल्या टप्प्यातील आठ आरोग्य केंद्राच्या सुस्थितीतून स्पष्ट होते. वातानुकूलित प्रतीक्षालय, १० रुपयांत विविध तपासणीसह औषधी, आठवड्यातून एक दिवस तज्ज्ञ डॉक्‍टर आदी सुविधांमुळे गरीबच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णही खासगी रुग्णालयाऐवजी मनपाच्या आरोग्य केंद्रांना पसंती देत असल्याचे रोजच्या वाढत्या नोंदणीवरून अधोरेखित झाले. 

महापालिका टाटा ट्रस्टच्या सहकार्याने शहरातील २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सोयीयुक्त करणार आहे. यातील आठ केंद्रांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले. मनपाने इमारतीसह डॉक्‍टर, नर्स, फार्मासिस्ट उपलब्ध करून दिले. यासाठी नवीन भरतीही करण्यात आल्याचे मनपा मुख्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी नमूद केले. 

टाटा ट्रस्टने या रुग्णालयांचा कायापलट केला. ट्रस्टतर्फे या आरोग्य केंद्रांना एसी, टीव्ही, संगणक पुरविण्यात आल्याचे ट्रस्टचे टिकेश बिसेन यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची २४ तास आरोग्य केंद्रावर नजर आहे. यामुळे आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली असून, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आरोग्य सेवा सुरू असते. 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांमुळे कामाप्रती उत्साह वाढल्याचे इंदोरा आरोग्य केंद्रातील डॉ. श्रद्धा वाशीमकर यांनी सांगितले. यापूर्वी येथे १० ते १२ रुग्ण दररोज येत होते, आता रोज ६० ते ७० रुग्ण येत असल्याचे त्यांनी नमूद केले. रुग्णांची नोंदणी डिजिटल पद्धतीने होते. नोंदणी केलेल्या रुग्णाला  एक क्रमांक मिळतो, या क्रमांकाच्या आधारे रुग्णाला २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी कुठेही स्वतःचा ‘डाटा’ बघता येते. त्यामुळे कुठल्याही आरोग्य केंद्रात रुग्णाला आपला क्रमांक सांगून आरोग्य सेवा घेता येणे शक्‍य झाल्याचे झिंगाबाई टाकळी येथील आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टर स्नेहल पांडव यांनी सांगितले. 

कपिलनगर येथील आरोग्य केंद्र एका खोलीत होते. आता प्रशस्त इमारत तयार असून, नोंदणी  कक्ष, औषधी वितरण कक्ष, लॅब, स्टाफ रूम आदी तयार केले आहे. एवढेच नव्हे गर्भवती महिलेच्या तपासणीसाठी वेगळा विशेष कक्ष तयार करण्यात आल्याचे येथील डॉक्‍टर प्रज्ञा गजभिये यांनी नमूद केले. 

या आरोग्य केंद्रांमध्ये रक्त, लघवी, कफ तपासणी करूनही मिळत असून, तत्काळ आजाराचे निदान लागण्यास मदत होत असल्याचे फुटाळा आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टर रेणुका यावलकर यांनी सांगितले.  

मनपाने इमारत, जागेसह डॉक्‍टर व इतर कर्मचारी उपलब्ध करून दिले. आता सदरमध्ये केंद्रीय लॅब तयार करण्यात येणार आहे. येथे २२ तपासण्या होतील. जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन किंवा जीपीएस युक्त घडाळ देण्याचा विचार आहे.  
- डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी, मनपा मुख्यालय. 

पहिल्या टप्प्यात आठ, दुसऱ्या टप्प्यात १०, तिसऱ्या टप्प्यात ८, असे एकूण २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत पायाभूत सुविधांसह औषधी आदी उपलब्ध करून देण्याबाबत टाटा ट्रस्टशी करार करण्यात आला. हा करार तीन वर्षांचा आहे. आरोग्य केंद्रांमध्ये संगणक, औषधीसाठी फ्रिजर, एसी, आरामदायक खुर्ची, रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्या, टीव्ही आदी उपलब्ध करून देण्यात आले. 
- टिकेश बिसेन, टाटा ट्रस्ट.

अल्प दरात सीटी स्कॅन, एमआरआय 
या आरोग्य केंद्रांपैकी झिंगाबाई टाकळी येथील डॉक्‍टर स्नेहल पांडव यांनी विशेष पुढाकार घेऊन रुग्णांना अल्पदरात सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या.  डॉ. पांडव यांनी काही खाजगी रुग्णालयांशी संपर्क करून गरिबांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. खासगी रुग्णालयांमध्ये ३ हजार रुपये खर्च असलेले सीटी स्कॅन त्यांच्या मार्फत १ हजार, सोनोग्राफीसाठी केवळ ५०० रुपये तर बाहेर आठ हजार रुपये दर असलेले एमआरआय स्कॅन केवळ अडीच हजार रुपयांत शक्‍य असल्याचे डॉ. पांडव यांनी सांगितले.

मनपा कर्मचाऱ्यांसाठी निःशुल्क सेवा
मनपातील कर्मचारी, बीपीएलधारक तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध आहे. एक आरोग्य केंद्र ५० हजार लोकसंख्येचा विचार करून सुरू करण्यात येते. फुटाळा येथील आरोग्य केंद्र ५० हजार, कपिलनगर आरोग्य केंद्र ६५ हजार लोकवस्तीसाठी आहे. प्रत्येक भागातील रुग्णांना केवळ १० रुपयांत किंवा मोफत आरोग्य तपासणी व उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध झाली.

पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेले केंद्र  
फुटाळा, डिप्टी सिग्नल, नंदनवन, शांतीनगर, जयताळा, इंदोरा, झिंगाबाई टाकळी, कपिलनगर. 

दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित केंद्र  
मेहंदीबाग, जागनाथ बुधवारी, शेंडेनगर, मोमिनपुरा, बिडीपेठ, भालदारपुरा, बाबूळखेडा, हजारीपहाड.

रुग्णांसाठी वातानुकूलित प्रतीक्षालय 
१० रुपयांत तपासणीसह औषधही ‘मेकओव्हर’मुळे डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ 

‘सकाळ’च्या स्टिंग ऑपरेशनची दखल
महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील अनियमितता, दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ‘सकाळ’ने मागील वर्षी मे महिन्यात ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. सलग चार दिवस ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्याने महापौरांनी दखल घेतली. त्यानंतर शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणांबाबत चर्चेच्या फैरी झडल्या अन्‌ सुधारणांचा निर्णय झाला. 

‘सकाळ’च्या स्टिंग ऑपरेशनमुळे आज नागपूरकरांना अत्याधुनिकच नव्हे तर लक्‍झरी सुविधाही आरोग्य केंद्रांत उपलब्ध होत आहे. ‘सकाळ’ने १७ व १८ मे २०१७ रोजी प्रकाशित केलेली पाने.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com