प्रेयसीला वारांगना समजल्याने खून

Murder
Murder

नागपूर - तडीपार असलेला कुख्यात गुंड शहरात राहणाऱ्या प्रेयसीला घेऊन गंगाजमुना परिसरात बसला होता. गंगाजमुनात आलेला ट्रकचालक विजय बहादूर यादव (२४, रा. नारी रोड) याने त्याच्या प्रेयसीकडे नजर रोखून पाहून व पैसे दाखवून इशारे केले. यावरून विजयचा शांतीनगर हद्दीतील कुख्यात गुंड सागर शिवलाल यादव (२२) याने खून केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून सागरला अटक केली.

ट्रकचालक विजय यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर गावचा आहे. त्याचा भाऊ जरीपटक्‍यातील नारी रोड परिसरात राहतो. तो काही महिन्यांपासून भावाकडेच राहत होता. विजयचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले. त्याची पत्नी उत्तर प्रदेशात राहते. ट्रकचालक असल्याने तो नेहमी बाहेर राहत होता. सागर हा कुख्यात गुंड असून, त्याच्यावर ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वी झोन ३ च्या उपायुक्तांनी त्याला दोन वर्षांसाठी नागपूर शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याची प्रेयसी गंगाजमुना सिमेंट मार्गावर बालाजी मंदिराजवळ राहते.

बुधवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास सागर तिच्यासोबत घरासमोर बसला होता. विजय मौजमजा करण्यासाठी गंगाजमुना परिसरात गेला होता. तेथून घरी परताना त्याला सागर आणि प्रेयसी रस्त्याच्या कडेला अंधारात काहीतरी करताना दिसले. 

विजय तेथेच उभा राहून सागरच्या प्रेयसीला पैसे दाखवून इशारे करीत होता. सागरने विजयची समजूत घालून प्रेयसी असल्याचे सांगितले. मात्र, विजयचा विश्‍वास बसला नाही. त्याने जास्त पैसे देण्याचे सांगून प्रेयसीकडे धाव घेतली. त्यामुळे सागरने चाकू काढून विजयला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून पळून गेला.

राज्याबाहेर जाण्याची तयारी
सागर यादव हा खून केल्यानंतर घरी पोहोचला. त्याने रक्‍ताचे डाग आणि हातपाय धुतले. पहाटेच्या सुमारास बॅग भरली आणि रेल्वेने शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या घराभोवती सापळा रचला आणि घरातूनच अटक केली. त्याने प्रेयसीला वारांगना समजून पैसे देऊन शारीरिक संबंधाची मागणी केल्यामुळे खून केल्याची कबुली दिली.

‘मर्डर’ सीसीटीव्हीत कैद
गंगाजमुनाच्या रस्त्यावर विजय रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अपघात झाला असावा या संशयातून दुचाकीने जाणाऱ्या युवकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून माहिती दिली. लकडगंज पोलिस घटनास्थळावर पोहोचले. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. तपासात विजयच्या मांडीवर तीक्ष्ण हत्याराचे वार असल्याचे दिसले. हे हत्याकांड रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामध्ये आरोपीचे कृत्य स्पष्ट दिसत होते.

तडीपारांना पोलिसांचा आशीर्वाद
पोलिस आयुक्‍त डॉ. वेंकटेशम हे पारदर्शक पोलिसिंगवर भर देत आहेत. मात्र, काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आयुक्‍तांच्या आदेशाला हरताळ फासतात. पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक तडीपार शहरात बिनधास्तपणे फिरत आहेत. ही बाब शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी गंभीर आहे. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच पोलिसांचा वचक राहण्यासाठी पोलिसांच्या कार्यप्रणालीत बदल करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com